Tue, Jul 23, 2019 01:59होमपेज › Sangli › महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा खा.राजू शेट्टी यांना टोला : सरकार सकारात्मकच

दूध, भाजीपाला रस्त्यावर; वा रे तुमचे आंदोलन!

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:45AMसांगली : प्रतिनिधी

दूध, भाजीपाला दरासाठी शेतकरी आणि संघटनांनी आंदोलन जरूर करावे. पण उत्पादकांनी घाम गाळून पिकविलेला भाजीपाला, दूध तुमच्या आंदोलनासाठी रस्त्यावर? वा, रे तुमचे आंदोलन, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांना पत्रकार बैठकीत लगावला. आंदोलनासाठी रस्तारोको करा, मोर्चे काढा, पण शेतीमालाची नासाडी करून  आंदोलन योग्य नाही, याचे त्यांनी आत्मचिंतन करावे, असेही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, शेतकरी कष्ट करून भाजीपाला कमावतो. जनावरे सांभाळून दूध मिळवतो. त्याला चांगला दर मिळाला पाहिजे हे योग्यच आहे. पण त्यासाठी शेट्टी यांनी जो आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे तो योग्य नाही. म्हणे मुंबईला दुधाचा थेंब आणि भाजीपाला जाऊ देणार नाही. दूध पिऊ नका, रस्त्यावर ओता ही भाषा योग्य नाही. हा एकप्रकारे त्यांचा अवमानच आहे. मुंबईचा दूध, भाजीपाला रोखून कोंडी करू, असे ते म्हणतात. मुंबई काय पाकिस्तानात आहे का? तेथेही आपलेच भाऊबंद आहेत ना?

ते म्हणाले, दूध दरासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. दूध भुकटीसाठी सरकारने प्रतिकिलो 50 रुपये अनुदान जाहीर केले आहे. आणखी काही पर्यायही शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचा शेट्टी यांनी आंदोलन करताना विचार करावा. राजकारणासाठी आंदोलन करून शेतकरी, दूध उत्पादकांचे हाल करू नका. 

दुबई बुडते, मग नागपूरचे काय?

ना. पाटील म्हणाले, पावसाचा कितीही अंदाज व्यक्‍त केला तरी कधी काय होईल सांगता येत नाही. वाळवंटी प्रदेशातील दुबईसारख्या शहरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तेथे गेल्यावर्षी अख्खी दुबई पाण्याखाली बुडण्याची वेळ आली. तेथे यापूर्वी अशी परिस्थिती झाली नसल्याने सांडपाणी निचर्‍याची व्यवस्थाच नसल्याने हा प्रकार घडला होता. मग पावसाळ्यात वारंवार अतिवृष्टी होणार्‍या नागपूरचे तर काय? तेथे अतिवृष्टीमुळेच विधानभवनात पाणी शिरले. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही वीज गेल्यावर जनरेटर सुरू करू शकत नव्हतो. शिवाय तासभरानंतर पाणीनिचरा होऊन विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले होते.