Thu, May 23, 2019 14:25
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › तासगाव : विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

तासगाव : विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

Published On: Jan 21 2018 2:38PM | Last Updated: Jan 21 2018 2:38PM
तासगाव : शहर प्रतिनिधी

येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना आज (रविवार २१ जानेवारी) घडली. प्रणाली प्रकाश पाटील (वय 17, रा. साखराळे, ता. वाळवा)  असे  आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती ड्रेस डिझाईनर शाखेला द्वितीय वर्षात शिकत होती.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी : प्रणाली ही गेल्या दोन वर्षांपासून महिला तंत्रनिकेतन येथे शिक्षण घेत आहेत. ती येथील शासकीय वसतिगृहामध्ये अन्य तीन मुलींसोबत राहत होती.  तिच्यासोबतच्या मुली काल (शनिवारी) गावाला गेल्या होत्या.. प्रणाली देखील गावाला जाण्यासाठी तयार होती. तसा अर्जही तिने लिहला होता. काल सायंकाळी आई वडिलांशी तिचे बोलणे झाले होते, तेंव्हा ती व्यवस्थित बोलली होती. आज सकाळी १० वाजले तरी प्रणालीने दरवाजा उघडला नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या मुलींनी तेथील महिला शिक्षकांना याबाबत माहिती दिली. त्यांनी प्रणालीच्या खोलीत खिडकीमधून डोकावून पाहिले असता तिने गळफास घेतला असल्याचे उघड झाले. याबाबत तासगाव पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सराटे यांनी प्राथमीक तपास केला. तिने ९च्या दरम्यान आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सराटे म्हणाल्या की, प्राणलीजवळ सापडलेल्या चिट्ठीत तिने, माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.’

महिला तंत्रनिकेतनच्या तक्रारी वाढल्या

दरम्यान या महाविद्यालयात सातत्याने मुलींसंदर्भात तक्रारी आढळून येत असतात. महाविद्यालयातील मुली रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरतानाही आढळून आल्या आहेत. महाविद्यालयाची संरक्षण भिंत अवघ्या ४ फुटांची आहे त्यामुळे महाविद्यालकडून या मुलींच्या खासगीपणाची काळजी घेण्यात कमतरता येत असल्याचे जाणवत आहे.

पत्रकारांना वार्ताकनांसाठी १ तास अडवले

आत्महत्या झाल्याची समजताच पत्रकारांना महाविद्यालयातील वसतिगृह अधीक्षक एस. यू. शिंदे यांनी पत्रकारांना तब्बल १ तास प्रवेश दिला नाही. महिला महाविद्यालय असल्याचे सांगून पुरुषांना प्रवेश देता येणार नाही असे सांगितले. मात्र, याचवेळी २ नगरसेवक आले असता त्यांची कोणतीही एन्ट्री न घेता त्यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी प्रशासनाकडून पोलिसांनीच आम्हाला सांगितले होते, प्रवेश देऊ नका, असे सांगण्यात आले मात्र पोलिसांनी याला नकार दिला.