Wed, Nov 14, 2018 10:30होमपेज › Sangli › रस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा

रस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा

Published On: Aug 31 2018 1:42AM | Last Updated: Aug 31 2018 12:36AMसांगली : प्रतिनिधी 

 जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सोमवारपासून रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करा. पंधरा दिवसांत वाहतूक योग्य रस्ता तयार करा, असे आदेश जिल्हाधिकारी  विजयकुमार  काळम-पाटील यांनी बांधकाम विभागातील अधिकार्‍यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सांगलीसह जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी  महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, कॉ. उमेश देशमुख, अमर निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, व्यापारी संघटनेचे अतुल शहा, विपीन देसाई, महापालिकेच्या उपायुक्‍त स्मृती पाटील आणि बांधकाम विभागाचे अधिकारी  उपस्थित होते . जिल्हाधिकारी पाटील आणि संघटनेच्या सदस्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले .

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जनतेचे हाल होऊ देऊ नका. गतवर्षीप्रमाणे लोकांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. आपल्या विभागाची काही अडचण असेल तर स्पष्ट सांगा.  सांगली ते पेठ रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्षांपूर्वीच दिले आहे तरी सुद्धा या कामाची निविदा निघण्यास एवढा का वेळ लागला ? माणसे मरण्याची तुम्ही वाट पाहता आहात का? ही बैठक घेण्याची वेळ का आली?  आंदोलन वाढल्यास कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली तर त्याला कोण जबाबदार राहणार? गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्याला कोणते काम केले ते ते मला लेखी द्या. 

बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी रस्त्यालगच्या गटारीची कामे करताना शेतकरी अडचण करतात. रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी द्या, असे सांगितले.  त्यावर जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, तीन महिने अवधी मिळणार नाही. तातडीने कामे सुरू करुन ती पंधरा दिवसांत पूर्ण करा. काम करताना कोणी अडवणूक केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. सांगली- कोल्हापूर रस्त्याची  अर्धवट कामे याबाबतची माहिती शासनाकडून मागविण्यात येईल. जिल्हा परिषदेकडे येणार्‍या रस्त्यांची   बीडीओंकडेे पत्रे पाठवून माहिती घ्या.

रस्त्यांची निकृष्ट दर्जाची  कामे, शामरावनगरमधील साचत असलेले पाणी, कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात गतीरोधक करणे, पूर नियंत्रण रेषेचे फेरसर्वेक्षण, कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मार्केट यार्ड या रस्त्यालगतची गटार आदी प्रश्‍नासंदर्भात  या बैठकीत चर्चा झाली.