Sat, Jul 20, 2019 21:48होमपेज › Sangli › बेदाणा उत्पादकांना अवकाळीची धडकी

बेदाणा उत्पादकांना अवकाळीची धडकी

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 15 2018 8:37PMलिंगनूर : वार्ताहर 

सांगली जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून ढगाळ हवामान झाले आहे. रात्री अनेक ठिकाणी पावसाचे हलके थेंब पडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बेदाणा उत्पादकांची चिंतेने झोप उडाली आहे. सध्या काही द्राक्षे बेदाणा निर्मितीत रॅकवर आहेत. काहींची बागेतून घडांची काढणी सुरू आहे. अनेक बेदाणा शेडवर पहिल्या ते बाराव्या दिवसापर्यंतची द्राक्षे बेदाणा निर्मितीच्या प्रक्रियेत आहेत. अशातच अवकाळी पाऊस वादळ वार्‍यासह येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात वादळ, पाऊस आणि गारपीट याचा फटका बेदाणा निर्मिती आणि द्राक्षांना बसू शकतो. तसेच कालपासून सुरू झालेल्या ढगाळ हवामानामुळे बेदाणा ग्लेझिंग कमी होणार आहे. पाऊस पडला तर बेदाणा काळा पडण्याची भीती निर्माण झाली आहे. 
काल सायंकाळ पासूनच मिरज पूर्व भागात हवामान ढगाळ राहिले आहे. रात्री उशिराने हलके पावसाचे थेंब सुरू झाले होते. शिवाय आज सकाळी नऊ वाजेपर्यंत ढगाळ आणि आर्द्र हवामान झाले आहे. 

इथे आहेत सर्वाधिक  बेदाणे रॅक : मिरज पूर्व भागात खंडेराजुरी, सुभाषनागर, कळंबी, मालगाव, बेळंकी, खटाव, चाबुकस्वारवाडी, कवठेमहांकाळमधील ढालगाव, नागज, चोरोची, आगळगाव, शेळकेवडी, कुकटोळी यासह बहुतांश गावात बेदाणा निर्मिती सुरू आहे. जिल्ह्यातील काही द्राक्षे जुणोनी, सांगोला, जुजारपूर या भागात जातात. तर जत आणि सीमावर्ती भागातील काही माल कर्नाटक मध्येही बनविण्यास विजापूर, अथणी आणि जत सीमावर्ती भागात रॅकवर आहेत.

सध्या पाच महिन्यांची द्राक्षे बागेत : सध्या बाजारपेठेत पाठवायची द्राक्षे 90 टक्के विक्री होऊन संपले आहेत. पण बेदाणा निर्मितीसाठी राखलेल्या बागेपैकी अद्याप पन्नास टक्के बागा आणि द्राक्षे शिल्लक आहेत. यातील द्राक्षे किमान साडेचार ते पाच महिने झालेली पक्व आणि 22 च्या दरम्यान ब्रिक्स शुगर असलेली आहेत. त्यामुळे दोन दिवस धडकीचे आहेत. 

खबरदारीचे आवाहन : 

कमी दाबाचा पट्टा कर्नाटका मध्ये सक्रिय झाला आहे. उद्या 15 मार्चला कोकण, गोवा, कोल्हापूर मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात 16 मार्च ला पाऊस व जोराचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 17 मार्च ला कमी दाबाचा पट्टा पूर्णपणे निष्क्रिय होणार आहे. तरी सर्व शेतकर्‍यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषीविषयक संस्था, मार्गदर्शक यांच्याकडून करण्यात येत आहे.