आष्टा : प्रतिनिधी
धनगर समाजाला आरक्षण मिळावे ( अनुसूचित जमाती संवर्गात समावेश व्हावा) या मागणीसाठी सोमवारी शहरात बंद पाळण्यात आला. मोटारसायकल रॅली काढून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात धनगर समाजातील युवक व मेंढपाळ पिवळे ध्वज घेऊन व पिवळ्या टोप्या परिधान करून शेळ्या - मेंढ्यांसह सहभागी झाले होते. प्रारंभी येथील बसस्थानक चौकात राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुण्यातिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनाला सुरूवात झाली. कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोटारसायकल रॅली काढली. बसस्थानक चौकात येऊन चक्काजाम आंदोलन केले.
आष्टा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माने, काँग्रेसचे अमोल पडळकर, नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्यासह नगरसेवक वीर कुदळे, संग्राम पाटील, विजय पाटील, दिलीप वग्याणी , किरण काळोखे, अर्जुन माने, सोमाजी डोंबाळे, सुनील माने,विराज शिंदे, माणिक शेळके, अमित ढोले,बाबासाहेब सिध्द, सागर सिध्द यांनी मनोगत व्यक्त केले. अप्पर तहसीलदार उदय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.प्रताप घस्ते यांनी प्रा.मधुकर वायदंडे प्रणित दलित महासंघाच्या वतीने, रिजवान नायकवडी व नूर मुजावर यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने आणि विनय कांबळे यांनी काँग्रेस पक्ष व बौध्द समाजाच्या वतीने धनगर आरक्षणाला पाठिंबा दिला.
अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनात धनगर समाजाचे जेष्ठ नेते रामचंद्र सिध्द, के.ए.माने, आनंदा शेळके, सोमाजी डोंबाळे राजू माने,भिमराव डोंबाळे, अनिल सिध्द, अशोक भानुसे, माणिक भानुसे, पोपट शेळके, शिवाजी ढोले, अमित ढोले ,दत्ता ढोले, उत्तम ढोले, रघुनाथ जाधव , शामराव गावडे ,दिनकर ढोले, भिमराव माने, अमोल माळी दिपक माने ,विनोद चोरमुले, विशाल माने व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.