मिरज : जे. ए. पाटील
सांगली, मिरज शहर बस वाहतुकीची मार्केट फेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीला जाण्याकरीता प्रवाशांना वडाप रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. किंवा मिरज स्टँडपर्यंत जाऊन तेथून बस पकडावी लागते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने सांगली व मिरज आगारामार्फत शहरी बस सेवा चालविली जाते. सांगली आगारामार्फत जयसिंगपूर, कुपवाड एमआयडीसी मार्गे मिरज, सांगली-मिरज दरम्यान काही फेर्या व पश्चिम भागातील ग्रामीण भागातील 20 किमी पर्यंत बस सेवा चालविण्यात येते. तर मिरज आगारामार्फत मिरज-सांगली, मिरज-कुरुंदवाड, कुपवाड एमआयडीसी मार्गे सांगलीला काही फेर्या आणि पूर्व भागात 20 किमी अंतरापर्यंत बस सेवा चालविण्यात येत होती.
सांगली, मिरज आगारामार्फत चालविण्यात येणार्या फेर्यांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. सांगली आगाराकडे सांगली-मिरज, जयसिंगपूर मार्गावरील फेर्या देण्यात आल्या आहेत. तर मिरज आगाराकडे मिरज-कुपवाड एमआयडीसी-सांगली, मिरज-कुरुंदवाड आणि पूर्व भागातील बस फेर्या सोपविण्यात आल्या आहेत.
मिरज आगारामार्फत सांगली-मिरज दरम्यान चालविण्यात येणारी बससेवा मिरज मार्केट पर्यंत सुरू होती. आता हा मार्ग सांगली आगाराकडे सोपविण्यात आल्यामुळे सांगलीहून मिरज मार्केटपर्यंत येणार्या फेर्या बंद करण्यात आल्या असून त्या मिरज स्टँड पर्यंतच सोडण्यात येत आहेत. प्रवासी संख्या पुरेसी नसल्याने हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सांगलीला बसने जाण्याकरीता प्रवाशांना मिरज स्टँडपर्यंत रिक्षा किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्थेने जावे लागते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
सन 1985 दरम्यान शहरी बस वाहतुकीचा विस्तार करण्यासाठी मिरज- मालगाव रस्त्यावर दिंडीवेस येथे नवीन शहरी बसस्थानक सुरू करण्यात आले होते. काही दिवस मिरज मार्केट पर्यंतच्या बसेस दिंडीवेस पर्यंत सोडण्यात येत होत्या. परंतु प्रवाशांच्या पुरेशा संख्येअभावी दिंडीवेसचे शहरी बसस्थानक बंद करण्यात आले. बस मिरज मार्केटमधूनच सांगलीकडे ये-जा करीत होत्या. परंतु गेल्या काही वर्षापासून मिरज-सांगली दरम्यान वडाप रिक्षा सुरू झाल्याने शहरी बसच्या प्रवाशांची संख्या घटत गेली. बस येण्यापूर्वी प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांनी वडाप रिक्षा वाहतुकीला पसंती दिली जाते. त्यामुळे शहरी बस वाहतुकी पुढे मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक फेर्या तोट्यात चालत असल्याने लाखो रुपयांचे नुकसानही होत आहे.
दिवसभरात सांगलीहून मालगावकडे होणार्या दोन फेर्या तसेच मिरज स्थानकातून मालगाव-खंडेराजुरी, टाकळी-मल्लेवाडी-एरंडोली, बोलवाड, म्हैसाळ-नरवाड, कुरुंदवाडकडे होणारी निमशहरी बस वाहतूक वखारभाग आणि जवाहर चौकातून होते. त्यामुळे मार्केट, ब्राम्हणपुरी, किल्लाभाग, विजापूर वेस भागातील प्रवाशांना आडमार्गाने जाणार्या निमशहरी तसेच ग्रामीण बसेसवर अवलंबून रहावे लागत आहे.