Thu, Mar 21, 2019 16:08होमपेज › Sangli › वारणा योजनेविरोधात उद्या 15 गावांत बंद 

वारणा योजनेविरोधात उद्या 15 गावांत बंद 

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 8:04PMबागणी : प्रतिनिधी 

इचलकरंजीसाठी वारणा पाणी योजना करण्याच्या नावाखाली वारणा खोर्‍यातील शेतीचे पाणी पळविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करीत हे कारस्थान उधळून लावण्यासाठी गुरूवारी दि. 18 मे रोजी वारणा परिसरातील 15 गावात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. ढवळी (ता. वाळवा) येथे मंगळवारी वारणा परिसरातील गावांचे सरपंच, प्रमुख पदाधिकारी शेतकर्‍यांची व्यापक बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

ढवळीचे माजी सरपंच शरद पाटील यांनी सांगितले, इचलकरंजी शहरासाठी वारणा पाणीपुरवठा योजना झाल्यास वारणा काठच्या गावांमधील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. या भागातील शेतकर्‍यांनी महागड्या व्याजदराने कर्ज काढून वारणेवरुन शेतीसाठी पाणी योजना केल्या आहेत.  मुळात वारणा पाणी योजनेसाठी चांदोली धरणात पाणी साठाच शिल्लक नाही. असे असतानाही ही पाणी योजना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण वाळवा तालुका आणि वारणा खोरे हे क्रांतीकारकांचा आहे. कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणाचा अन्याय सहन करायचा नाही, ही वारणा खोर्‍याची परंपरा आहे.

ते म्हणाले, इचलकरंजीसाठी कृष्णा तसेच पंचगंगा नदीतून पाणीयोजना सुरू आहेत. असे असतानाही केवळ सत्तेच्या जोरावर या पाणी योजनेच्या हालचाली होत आहेत, त्या हाणून पाडण्यासाठी भागातील सर्व गावांत बंद पाळण्याचे त्यांनी शेवटी आवाहन केले.प्रारंभी गावचे माजी सरपंच जगन्नाथ पाटील यांनी स्वागत केले. यावेळी बागणीचे सरपंच संतोष घनवट यांनी वारणा पाणी योजनेविरोधात वेळ पडली आक्रमक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. शिगावचे सरपंच उत्तम गावडे यांनी या आंदोलनाला सक्रिय सहभाग जाहीर केला. ढवळीच्या सरपंच सौ. पद्मावती माळी, काकाचीवाडीचे सरपंच प्रमोद माने, कोरेगावचे  सरपंच मयूर पाटील, फारणेवाडीचे उपसरपंच संतोष सिध्द, चाँदसो इनामदार, बहादूरवाडीतील पाणी योजनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सरपंच राजेंद्र पाटील उपस्थित होते.