मिरज : प्रतिनिधी
पीर नालसाब चौकात महापालिकेने उभारलेला कारंजा नागरिकांनींच परस्पर पाडून टाकला. त्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. याबाबत महापालिकेच्या अधिकार्यांना मात्र कोणतीच माहिती नव्हती. जागेची पाहणी करून संबंधीत दोषींवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका अधिकार्यांनी दिला आहे.
सन 2008 मध्ये तत्कालीन महापौर मैनुद्दीन बागवान यांनी पुढाकार घेऊन कारंजा व परिसराचे सुशोभीकरण केले होते. वर्षभर कारंजा सुरू होता. नंतर बंद पडला. तिथे पाणी साचून परिसरात दुर्गंधी वाढली. डासांचा फैलाव झाला होता.
बंद कारंजा काढून टाकण्याबाबतचा ठराव मैनुद्दीन बागवान यांनी महासभेत दोन, तीन महिन्यांपूर्वी मांडला होता. तो संमत झाला होता. महापालिकेने काढून टाकण्यापूर्वीच नागरिकांनी तो पाडून टाकला.
सहायक आयुक्त संभाजी मेथे यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. जिल्हा सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त रविंद्र खेबुडकर यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली. चौक परिसरातील कारंजा पाडून टाकण्याची कारवाई नागरिकांनी का केली याचे कारण गुलदस्त्यात आहे.