Sat, Apr 20, 2019 08:40होमपेज › Sangli › परराज्यातील दूध बंद करा

परराज्यातील दूध बंद करा

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 11:15PMइस्लामपूर : प्रतिनिधी

राज्यातील अतिरिक्‍त दूध व दूध पावडरीचे घसरलेले दर यामुळे  हा व्यवसाय अडचणीत आला आहे. राज्य सरकारने  दूध दरप्रश्‍नी वेळीच निर्णय व उपाययोजना न केल्याने  संकट  वाढल्याची टीका प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. परराज्यातून येणार्‍या दुधावर राज्य सरकारने बंदी घालावी, अशीही मागणी त्यांनी केली.
राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या 44 व्या  वार्षिक सभेत  ते बोलत  होते. संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील  अध्यक्षस्थानी होते. सभेत सर्व ठराव मंजुर झाले. 

आमदार पाटील म्हणाले, गुजरातमधून मुंबई मार्केटमध्ये अमूल दूध, कर्नाटकातून  नंदिनी दूध मोठ्या प्रमाणात येते. शेजारच्या राज्यात दूध दरासाठी सबसिडी दिली जाते.  येथे अतिरिक्‍त दूध आणि परराज्यातील दुधावर सरकारचे नियंत्रण नसल्याने  दर घसरले. मोठ्या प्रमाणावर दूध पावडर तयार करण्यात आली, मात्र त्याचेही दर घसरले आहेत. केंद्र सरकारने  पावडर निर्यातीसाठी अनुदान देण्याची गरज आहे. 

दरवाढ कधी मिळणार?

दूधदराचा हा गंभीर प्रश्‍न  आमदार अजित पवार यांच्यासह आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडला. नागपूर अधिवेशनात  आवाज उठविला. दूध दरासाठी आंदोलन झाले. त्यातून 5 रुपये प्रतिलिटर  दरवाढ मिळाली. मात्र,  आता 24 दिवस उलटले तरी एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही. दरवाढ मिळालीच तर विनायकराव तुम्ही मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ   द्या, अशी मार्मिक टिप्पणी आमदार पाटील यांनी केली.  विनायकराव पाटील म्हणालेे, कार्यक्षेत्रात 208 मुक्‍तसंचार गोठे तयार झाले. 1678 गायी-म्हशींच्या खरेदीसाठी 9.81 कोटींचे कर्जवाटप केले. 1.74 कोटींचे अनुदान दिले. कृष्णा ब्रॅण्डच्या दर्जामुळे विक्री वाढत आहे.  दूध दरामुळे संघास तोटा होत असूनही शेतकर्‍यांचे हित विविध योजनांमधून जपले आहे. संघास देशातील मानाचा ‘डेअरी एक्सलंन्स अ‍ॅवॉर्ड’ व  संघाच्या उत्पादनांना ‘क्वॉलिटी मार्क’ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात कृष्णा सुगंधी दूध, कृष्णा आईस्क्रीम, टेबल बटर बाजारात आणणार आहोत.सर्वाधिक दूध पुरवठा करणार्‍या व्यक्‍ती, संस्थांचा व पशुखाद्य बक्षिसपात्र संस्थांचा गौरव करण्यात आला.

संघाचे असिस्टंट मॅनेजर बी. ए. कोरे, कार्यकारी संचालक सुरेश पटेल, कार्यालयीन अधीक्षक लालासाहेब साळुंखे, अकौंटस् मॅनेजर पी. डी. साळुंखे आदींनी सभेचे संयोजन केले. अध्यक्ष पाटील यांनी  दूध संघाचा कुपवाड येथील पशुखाद्य प्लँन्ट विकण्यास मंजुरीचा ठराव आयत्यावेळच्या विषयात मांडला. पोपट कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी आभार मानले. 

विनायकराव, संचालकांची प्रशंसा...

प्रतिकूल परिस्थितीतूनही उत्तम वाटचाल तसेच प्रति रुपयातील प्रशासकीय खर्चाला 30 पैसे मान्य असतानादेखील केवळ 15 पैसे एवढाच खर्च करून उर्वरित 85 टक्के रक्कम शेतकर्‍यांना दिल्याबद्दल संघाचे अध्यक्ष  पाटील व संचालकांचे  आ. जयंत पाटील यांनी जाहीर अभिनंदन केले.