Fri, Jul 19, 2019 18:12होमपेज › Sangli › वारणाकाठी 15 गावांत कडकडीत बंद 

वारणाकाठी 15 गावांत कडकडीत बंद 

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 7:58PMबागणी : प्रतिनिधी 

इचलकरंजीसाठी वारणा पाणी योजनेच्या नावाखाली वारणा खोर्‍यातील  शेतीचे पाणी पळविण्याचे षडयंत्र आहे असा आरोप करीत  गुरुवारी वारणा काठावरील जवळपास 15 गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.   या बंदमुळे नेहमी गजबज असलेल्या वारणा टापूत सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. दरम्यान, युवकांनी मोटरसायकल रॅली काढली. यात शेकडो तरुण, शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. 

वारणा परिसरातील गावांचे सरपंच, प्रमुख पदाधिकारी, शेतकर्‍यांची मंगळवारी ढवळी येथे व्यापक बैठक होऊन तीत या बंदचे आवाहन करण्यात आले होते.  बंदला भागातील सर्वच गावांत मोठा प्रतिसाद मिळाला. वारणा नदी बचाव कृती समितीच्यावतीने या बंदचे आवाहन करण्यात आले होते. बागणी, शिगाव, फाळकेवाडी, फारणेवाडी, ढवळी, कोरेगाव, बहादूरवाडी, मालेवाडी, काकाचीवाडी, तांदूळवाडी आदीं गावांमध्ये गावकर्‍यांनी व्यवहार बंद ठेवले होते. 

बागणी, काकाचीवाडी येथे बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शिगावचे उपसरपंच जितेंद्र पाटील  म्हणाले, इचलकरंजीसाठीची वारणा पाणीपुरवठा योजना झाल्यास वारणा काठच्या गावांमधील शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. वारणा काठावरील शेकडो गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  दरम्यान, शिगाव येथे बंदला प्रतिसाद मिळाल्याचे सरपंच  उत्तम गावडे यांनी सांगितले. बहादूरवाडी येथे देखील गावकर्‍यांना सर्व व्यवहार बंद ठेवून  पाठिंबा दिला.  

पिण्याच्या नावाखाली उद्योगासाठी पाणी

वारणा पाणी योजनेला नदी बचाव कृती समिती प्रखर विरोध करेल, असा इशारा देऊन समितीचे निमंत्रक तथा ढवळीचे माजी सरपंच शरद पाटील म्हणाले, वारणा पाणी योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या नावाखाली उद्योगांसाठी वारणेचे शुद्ध आणि आरोग्यदायी पाणी पळविण्याचे हे कारस्थान आहे. मात्र हा डाव वारणा खोर्‍यातील शेतकरी कदापि यशस्वी होऊ न देता हे कारस्थान उधळून लावेल. सरकारने देखील वारणा खोर्‍यातील शेतकर्‍यांच्या विरोधाची, त्यांच्यातील असंतोषाची वेळीच दखल घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला. 

कोरेगावात आठवडी बाजार बंद ठेवला 

वारणा पाणी योजनेला विरोध करण्यासाठी आज वारणा भागातील पुकारलेल्या बंदला कोरेगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी कोरेगाव येथे आठवडी बाजार भरतो. मात्र गावकर्‍यांनी आठवडी बाजारदेखील बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. सरपंच मयूर पाटील म्हणाले, वारणा पाणी योजनेच्या नावाखाली  वारणा खोर्‍यातील  शेतीचे पाणी पळविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मात्र वारणा खोर्‍यातील जिगरबाज शेतकरी हा डाव हाणून पाडतील, प्रसंगी यासाठी रस्त्यावरील आंदोलन उभारू.  विविध पदाधिकारी, युवक, शेतकरी उपस्थित होते.