Tue, Jul 16, 2019 01:58होमपेज › Sangli › लिपिकाचा शिपाई होण्यासाठी मोजले पाच हजार रुपये!

लिपिकाचा शिपाई होण्यासाठी मोजले पाच हजार रुपये!

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 10:40PMसांगली ः प्रतिनिधी

पंचायत समितीच्या एका कनिष्ठ लिपिकाला शिपाई पदावर पदावनत होण्यासाठी पाच हजार रुपये मोजावे लागले. पदोन्नतीसाठी ‘राजीखुशी’चा मामला ऐकिवात असतो, पण इथे पदावनत होण्यासाठीही काहीतरी टेकवावे लागले. या प्रकाराची जिल्हा परिषदेत जोरात चर्चा आहे. 

चार वर्षांपूर्वी एका शिपायाची कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती झाली होती. मात्र, वैद्यकीय कारण आणि कामाचा ताण सहन होत  नसल्याने संबंधित कनिष्ठ लिपिकाने पूर्ववत शिपाई पदावर पदावनत करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला होता. संबंधित शिपायाला पदावनत करून त्याच तालुक्यात नेमणूक देण्यासाठी 5 हजार रुपयांचा ‘जिझिया कर’ भरावा लागल्याची चर्चा जोरात आहे. 

काही कर्मचार्‍यांच्या निर्ढावलेपणाचे आणखी एक उदाहरण अतिशय बोलके आहे. सेवेत असताना कर्मचारी मृत्यू पावल्यास कुटूंबातील अवलंबितापैकी एकास अनुकंपा तत्त्वावर नोकरी लागते. या अनुकंपा यादीत नाव घालण्यासाठी एकाकडे पाच हजार रुपयांची मागणी झाल्याची चर्चा आहे. अनुकंपा यादीत नाव घालण्यासाठी आणि पदावनत करण्यासाठी पैशाची मागणीचा हा  प्रकार गंभीर आहे. याची वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.