होमपेज › Sangli › स्वच्छ अभियान संपताच कचरा रस्त्यावर

स्वच्छ अभियान संपताच कचरा रस्त्यावर

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 10:55PMसांगली : प्रतिनिधी

जानेवारी - फेब्रुवारीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्पर्धेत महापालिका क्षेत्राने देशात पहिल्या तीन क्रमांकात बाजी मारली. मात्र अभियान संपल्यानंतर दोन महिन्यांतच कचरा उठाव कामाचा बोजवारा उडाला आहे. प्रत्येक उपनगरात ओसंडून वाहणार्‍या कचरा कुंड्या आणि त्यात मोकाट जनावरांचा उच्छाद यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबद्दल तक्रारी करूनही महापालिका प्रशासन कोणताही कार्यवाही करीत नसल्याची तक्रार  आहे.

स्वच्छ भारत अभियान स्पर्धेसाठी आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी जोरदार मोहीम राबविली होती. यासाठी महापालिका प्रभागरचनेसह अन्य कामांच्या गडबडीतही शहर स्पर्धेत उतरविण्यासाठी यंत्रणेला जागते ठेवले होते.  रात्रीही कचरा उठाव करण्याची भूमिका घेतली होती. अ‍ॅपच्या माध्यमातून जनतेला कचर्‍याबाबत ऑनलाईन तक्रारी करण्याचेही आवाहन केले होते. त्यामुळे त्या स्पर्धेत महापालिका राज्यात पहिली आली होती. देशपातळीवर स्पर्धेतही पहिल्या तीन क्रमांकात येण्यासाठी अशीच मोहीम राबविली. यासाठी शून्य कचरा मोहीमही  सुरू ठेवली होती. 

परंतु ही मोहीम संपताच पुन्हा आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा ‘जैसे थे’ कारभार सुरू झाला आहे. शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग तसेच पडून आहेत. मुख्य वसाहतीत कचर्‍याचे ढीग  ओसंडून रस्त्यावर पसरत आहेत. आठवडाभर तसेच राहत आहेत. उपनगरांत तर यापेक्षा अधिक वाईट अवस्था आहे.एकीकडे कचरा रस्त्यावर, खुल्या भूखंडांमध्ये पडलेला असतो. दुसरीकडे सांडपाण्यामुळे तो कुजून दुर्गंधी निर्माण होत आहे. मोकाट जनावरे उकिरड्यांमध्ये शिरून तो विस्कटून टाकत आहेत. याबाबत तक्रारी करूनही आरोग्य विभाग दखल घेत नाही. हा कचरा हटण्यासाठी शासनाने आता पुन्हा एखादी स्पर्धा जाहीर  करण्याची आवश्यकता  आहे.

पावसाळा तोंडावर; नालेसफाईचा मुहूर्त कधी?

एकीकडे शहरात कचर्‍याचे साम्राज्य आहेे. दुसरीकडे शहरातील मुख्य गटारी, नाल्यांमध्येही कचरा मोठ्या प्रमाणात पडतो. यातच ड्रेनेज योजनेचाही बोजवारा उडाला आहे.  ड्रेनेज बॅकवॉटर शहरात पसरू लागले आहे.  याबाबतही अद्याप तोडगा निघालेला नाही. पावसाळापूर्व नालेसफाई दरवर्षी एप्रिलपासूनच सुरू होते. पण अद्याप त्याचा मुहूर्त झालेला नाही. यामुळे पावसाळ्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त होते आहे.

घनकचरा प्रकल्पाचा खेळखंडोबा

तीन शहरात दररोज सुमारे 180 टनांपेक्षा अधिक कचरा तयार होतो. त्यापैकी सुमारे 140 टन कचरा उचलला जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. उर्वरित किमान 35-40 टन कचरा रस्त्यावरच पडून राहतो. दुसरीकडे बेडग व समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोमध्ये किमान 5 लाख टन कचरा पडून आहे. कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी हरित न्यायालयाच्या आदेशाने घनकचरा प्रकल्पासाठी 40 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण अद्याप त्याचा खेळखंडोबाच सुरू आहे. 

प्लास्टिक  बंदीवरील  कारवाई  बासनात

कचर्‍याची मोठी डोकेदुखी संपविण्यासाठी शासनाने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. त्याची सक्‍त अंमलबजावणी करण्याचे आदेशही महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र अद्याप ही अंमलबजावणी कागदावरच आहे. कोठेही प्लास्टिकबंदीबाबत कारवाई केली जात नाही. दुसरीकडे उकिरड्यांत रोज किमान आठ-दहा टनांहून अधिक प्लास्टिकचा ढीग पडतो आहे. उठाव न झाल्याने हा सर्व कचरा रस्त्यावर पसरू लागला आहे.