होमपेज › Sangli › ‘शहर जिल्हाध्यक्ष’वरून राष्ट्रवादीत जुंपली

‘शहर जिल्हाध्यक्ष’वरून राष्ट्रवादीत जुंपली

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 10:59PMसांगली : प्रतिनिधी

शहर जिल्हाध्यक्ष निवडीवरून शनिवारी राष्ट्रवादी कार्यालयात चांगलीच जुंपली. संजय बजाज यांच्या फेरनिवडीला विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यासह गटाने आव्हान देत निवड रद्द करून मतदानाची मागणी केली. पक्षनेते आमदार जयंत पाटील आणि पक्ष निरीक्षक प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर यांच्यासमोर निवड बैठकीत हा वाद उफाळला.

यावेळी कमलाकर पाटील यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीला निमंत्रित न करता एकतर्फी बजाज यांची निवड केल्याचा आरोप केला. कमलाकर पाटील यांनी याप्रकरणी प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार करीत तसे निरीक्षक माळवदकर यांच्याकडे पत्रही दिले. त्यामुळे पदाधिकारी निवडीच्या बैठकीला वादाचे ग्रहण लागले आहे. 

दोन वर्षांपासून संजय बजाज व  कमलाकर पाटील गटात संघर्ष सुरू आहे. यातून कुरघोड्यांचे राजकारणही सुरू आहे. शिवाय कार्यक्रमांच्या निमित्ताने होणार्‍या डिजिटलबाजीत एकमकांचे ‘कार्यक्रम’ केले जातात.

संजय बजाज यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपद अशी दोन पदे आहेत. त्याला टार्गेट करून त्यापैकी एका पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कमलाकर पाटील गटाने जयंत पाटील यांच्याकडे केली होती. मात्र बजाज यांनी कोणत्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे संघर्ष वाढत आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांच्यासह अनेक नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी कमलाकर पाटील यांच्यासोबत असतात. शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष व कार्यकारणीची निवड करण्यासाठी जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील व  निरीक्षक श्री. माळवदकर सांगलीत आले होते.

प्रथम शहर जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीत संजय बजाज समर्थकांनी बजाज यांची फेरनिवड करण्याची मागणी केली. जयंत पाटील यांनी बजाज यांची निवड जाहीर केली. मात्र या निवडीच्या दरम्यान कमलाकर पाटील, शेडजी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी सभापती पद्माकर जगदाळे आदी कार्यालयात धावले. त्यांनी लेखी तक्रार केली. 

कमलाकर पाटील म्हणाले, बजाज यांनी पक्षवाढीसाठी ठोस काम केले नाही. सभासद नोंदणी अभियान राबविले, मात्र सभासद नोंदणीची माहिती अद्याप पक्षाला दिली गेली नाही. नगरसेवकांसह शहर जिल्हा पदाधिकारी देखील बजाज यांच्या कामावर नाराज आहेत. त्यामुळे त्यांची एकतर्फी केलेली निवड रद्द करावी.

ते म्हणाले, पक्षाच्या धोरणाप्रमाणे मतदान प्रक्रियेव्दारेच ही निवड करावी.  मात्र या वादावर जयंत पाटील यांनी मध्यस्थी करीत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कमलाकर पाटील गटाची त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. मात्र हा वाद मिटला नाही. अखेर कमलाकर पाटील गटाच्यावतीने बजाज यांच्या विरोधात केंद्र व राज्यस्तरावरील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकतर्फी निवड जाहीर करू नये, अशी मागणी देखील प्रदेशकडे करण्यात येणार असल्याचे कमलाकर पाटील यांनी सांगितले.

सर्वांनाच निमंत्रण; डावलले नाही

संजय बजाज म्हणाले, पक्षाच्या निवडीसंदर्भात रितसर सर्वांनाच निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे निवडीसाठी जाणीवपूर्वक डावलले नाही. माझ्या फेरनिवडीबाबत जयंत पाटील, निरीक्षक माळवदकर आणि पक्ष निर्णय घेईल.