Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Sangli › निवडणुकीत काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा वाद नाही

निवडणुकीत काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा वाद नाही

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 12:12AMसांगली : प्रतिनिधी 

महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कुणी करावे, याबाबत काँग्रेसमध्ये कोणतेही वादविवाद नाहीत. ही निवडणूक  एकदिलाने, एकविचाराने, एकत्रितपणे लढवली जाईल , अशी ग्वाही काँग्रेस नेत्यांनी बुधवारी येथे दिली. तसेच कोणत्याही निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

शहर काँग्रेसने महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक कच्छी भवन येथे घेतली.  यावेळी  काँग्रेसचे नेते  व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम म्हणाले, या निवडणुकीचे नेतृत्व कुणी करावे, याबाबत काँग्रेसमध्ये वाद असल्याच्या अफवा सध्या उठवल्या जात आहेत.काही कार्यकर्त्यांकडून तशी विचारणा केली जात आहे. पण आमच्यात कोणतेही वाद नाहीत. सर्वजण एकदिलाने, एकत्रितपणे एकविचाराने निवडणूक लढविणार आहोत. सर्व नेते प्रभागनिहाय दौरे करणार आहोत.

सांगली शहर चांगले करण्याचे मदन पाटील व पतंगराव कदम यांचे स्वप्न साकारण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिद्दीने व जोमाने कामाला  लागावे असेही आवाहन डॉ. कदम यांनी केले. जयश्री पाटील म्हणाल्या,  नेतृत्वाचा कोणताही वाद नाही. आम्ही सर्व नेते एक आहोत. एकत्रितपणे काम करुन कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही. कारण आपल्यापुढे धनशक्तीने मोठा असलेल्या भाजपचे आव्हान आहे. भाजपच्या एका नेत्याने भेट वस्तू देणार असल्याचे जाहीरपणे सांगून टाकले आहे. त्यामुळे आपल्याला नांदेड पॅटर्ननुसार निवडणूक लढवावी लागणार आहे. पक्षनिरीक्षक प्रकाश सातपुते यांनी कोणतेही मतभेद न करता सर्वांनी एकसंघपणे निवडणूक लढवावी, असे आवाहन केले. या वेळी शैलजा पाटील, विशाल पाटील, महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags : sangli, City Congress, municipal elections, discusses Meeting, sangli news,