Sat, Apr 20, 2019 18:10होमपेज › Sangli › पाण्यासाठी नागरिक स्थायीत घुसले

पाण्यासाठी नागरिक स्थायीत घुसले

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 10:21PMसांगली : प्रतिनिधी

गेल्या सहा महिन्यांपासून भारतनगरसह कोल्हापूर रस्त्यांवरील अनेक भागात पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होतो. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याबद्दल संतप्त नागरिक मंगळवारी स्थायी समिती सभेत घुसले. जनतेला सुविधा मिळत नाहीत, मग बैठकांचे फार्स कशाला करता? असा जाब विचारत त्यांनी सदस्यांसह अधिकार्‍यांना फैलावर घेतले. 
पाणीबिले माफ करा, असाही पवित्रा नागरिकांनी घेतला. स्थायी सभापती बसवेश्‍वर सातपुते, उपायुक्‍त सुनील पवार यांच्यासमोर घडलेल्या या प्रकारामुळे वातावरण तापले. अखेर पाणीपुरवठा कार्यकारी

अभियंता शीतल उपाध्ये यांनी बुधवारी पाणीपुरवठा सुरळित करण्याचे आश्‍वासन देत आंदोलकांना शांत केले. शहरात महापालिकेने माळबंगला येथे 70 व 56 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाल्याचा दावा केला आहे. परंतु निम्म्या सांगलीला नेहमीच पाणीटंचाईला समोर जावे लागते. शामरावनगर, भारतनगर, कोल्हापूर रस्त्यावरील उपनगरे, संजयनगर, धामणी रस्ता तसेच अनेक भागात तासभरही पाणी मिळत नाही..

येथील भारतनगर तर हिराबाग वॉटरवर्क्सपासून अगदीच जवळ आहे.  तेथे गेल्या सहा महिन्यांपासून अपुरे, अनियमित व कमीदाबाने पाणी येते. याबाबत तक्रारी केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून एखादा दिवस नियोजन होते. पुन्हा तीच परिस्थिती कायम आहे. यामुळे हैराण झालेल्या महिलांसह नागरिकांनी आज थेट महापालिकेत धाव घेतली. त्यांनी स्थायी समिती सभेत घुसून  अभियंता  उपाध्ये यांच्यासह सदस्यांना जाब विचारला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. 

नदीत मुबलक पाणी आहे. यंत्रणाही सज्ज असल्याचा दावा केला जातो. मग पाणी जाते कुठे ? तुमच्या नियोजनातच घोळ असल्याचा आरोप महिलांनी केला. असल्या बैठकांचे फार्स कशाला करता, असाही जाब त्यांनी विचारला.  नगरसेवक शिवराज बोळाज यांनीही उपाध्ये यांना यासंदर्भात जाब विचारला. हा ढिसाळ कारभार कधी थांबणार असेही ते म्हणाले. अखेर उपाध्ये यांनी तत्काळ श्री. मुलाणी यांच्यासह कर्मचार्‍यांना उपाययोजनेचे आदेश दिले. उद्यापासून पाणीपुरवठा सुरळित होईल, असे स्पष्ट केले. परंतु नागरिकांनी जर पाणीपुरवठा सुरळित झाला नाही, तर बिले देणार  नाही  असा पवित्रा घेतला.

पाणीबिले माफ करण्यासाठी महापौरांना साकडे

नदी हाकेच्या अंतरावर असूनही महापालिकेच्या ढिसाळ कारभाराने पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल भारतनगरच्या महिलांसह नागरिकांनी महापौर हारुण शिकलगार यांच्यासमोरही गार्‍हाणे मांडले. जर पाणी मिळत नसेल तर पाणीबिले पाठविणेच बंद करावे. आतापर्यंत आलेली बिले माफ करावीत, असाही पवित्रा घेतला.  शिकलगार यांनी उपाध्ये यांना या पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्याचे आदेश दिले.