Mon, Aug 19, 2019 18:17होमपेज › Sangli › शिवशक्तीनगरमधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार 

शिवशक्तीनगरमधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार 

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 8:08PMकुपवाड : वार्ताहर

शहरातील प्रभाग दोन मधील मिरज एमआयडीसी लगत असलेल्या शिवशक्तीनगर मधील नागरिकांना महापालिकेकडून गेल्या वीस वर्षांत कोणत्याही मुलभूत सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अरूण जगताप यांनी दिली. 

प्रभाग दोन मधील शिवशक्तीनगर मधील नागरिकांनी बिगरशेती करुन  सोसायटीची 1985 मध्ये स्थापना केली आहे. तत्कालीन कुपवाड ग्रामपंचायत, नगरपालिका, नंतर महापालिकेत या भागाचा समावेश होऊन ग्रामपंचायतीपासून ते आज अखेर या भागात रस्ते, गटारी अशा अनेक मुलभुत सोयी सुविधा नाहीत. या सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. या भागातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी, तोंडी तक्रारी करून आंदोलनेही केलेली होती. परंतु  प्रत्येक वेळेस महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे. 

या भागात मोलमजुरी करणारे व नोकरवर्ग राहत आहे. प्रत्येक पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्त्यावरील चिखलातून ये जा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच एमआयडीसीतील काही  कारखान्यांमधून   रसायनमिश्रीत सांडपाणी बाहेर सोडले जाते. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांच्या घरगुती बोअरचे पाणी खराब झाल्याने  अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

महापालिकेने गेल्या वीस वषार्ंत कोणत्याही सोयी सुविधा दिलेल्या नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते अरूण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. महापालिका प्रशासनाला आपल्या भागाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्यामुळे   निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.या बैठकीस गोविंद जाधव, रामचंद्र जाधव, रामा जाधव, बजरंग सपकाळ, भगतसिंग रजपूत, वैभव जाधव, अनिल जाधव, जयसिंग जगताप, प्रशांत गिड्डे, दिलीप मोरे, आदिनाथ रावळ, अशोक जाधव, प्रतीक जगताप, दादासाहेब जाधव, अनिल मोरे, रामदास जगताप, प्रतिक जाधव, अनिल कुडचे आदी उपस्थित होते.