Sat, Mar 23, 2019 02:08होमपेज › Sangli › सांगलीत युवकावर चॉपरने खुनीहल्ला

सांगलीत युवकावर चॉपरने खुनीहल्ला

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 11:45PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील गावभागातील कुंभार खिंड येथे एका युवकावर चॉपरने खुनीहल्ला करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आठ ते दहाजणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सांगली शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुंडा विरोधी पथकाने दोघांना अटक केली.

शिवतेज सुहास सावंत (वय 22, रा. मुजावर मळा, कर्नाळ), सूरज शशिकांत यादव (वय 20, रा. जामवाडी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यामध्ये स्वप्नील सुनील माने (वय 25, रा. कृष्णामाई रस्ता, गावभाग, सांगली) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याने शनिवारी दुपारी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्नील शुक्रवारी रात्री कुंभार खिंड येथे मित्रांसमवेत बोलत थांबला होता. त्यावेळी दोन्ही संशयितांसह आठ ते दहाजण चार मोटार सायकलवरून तेथे आले. तेथे त्यांनी त्याला रागाने का पाहतोस, असा जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. 

वादावादीचे पर्यवसान नंतर मारामारीत झाले. यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर चॉपरने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्यानंतर हल्लेखोर तेथून निघून गेले. त्यानंतर जखमी स्वप्नीलला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुनी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र हल्लेखोरांसह जखमीही तेथे नसल्याने ते परत आले. नंतर स्वप्नीलला सिव्हिलमध्ये दाखल केल्याचे समजल्यानंतर पोलिस सिव्हिलमध्ये गेले. 

तेथे स्वप्नीलने सुरुवातीला माझी कोणाविरूद्ध तक्रार नाही, असे पोलिसांना सांगितले. मात्र या गंभीर घटनेची दखल घेत पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी शनिवारी पुन्हा स्वप्नीलकडे चौकशी केल्यानंतर त्याने फिर्याद देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर अनोळखी आठ ते दहाजणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पथकाने सावंत व यादव यांना महावीर उद्यान परिसरात अटक केली. त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.