होमपेज › Sangli › मुलावर लैंगिक अत्याचारप्रकरणी कुंडल येथील पैलवानास शिक्षा

मुलावर लैंगिक अत्याचारप्रकरणी कुंडल येथील पैलवानास शिक्षा

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 04 2018 1:19AMसांगली : वार्ताहर

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सचिन सुरेश पाटोळे (वय 22,  रा. कुंडल, ता. पलूस)  याला दहा वर्षे सक्‍तमजुरी व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश सौ. सुप्रिया सापटणेकर यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे सौ. आरती साटवीलकर-देशपांडे यांनी काम पाहिले. 

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी : दि. 9 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 9 वाजता हा प्रकार झाला होता. दहा वर्षांचा पीडित मुलगा मित्रासमवेत कुंडल बसस्थानकाजवळील मंदिराच्या पाठीमागील उसामध्ये गणपतीच्या पूजेसाठी दुर्वा आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी परिसरातील एका कुस्ती केंद्रातील पैलवान सचिन पाटोळे त्याच्याजवळ गेला. त्यानंतर त्याने त्या मुलावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगा आरडाओरडा  करीत होता. परंतु सचिनने ते ऐकून घेतले नाही. 

काही वेळातच पीडित मुलाचा मित्र घटनास्थळी आला. त्याने तो अत्याचार बघितला. सचिने  त्या मुलाला घडलेली घटना कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलगा घरी गेल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. त्याच्या आईने त्याबाबत विचारले असता त्याने घडलेला प्रकार  सांगितला. त्यानंतर  कुंडल पोलिस ठाण्यामध्ये सचिन याच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.  पीडित मुलगा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने भा.दं.वि.कलम 377 , लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 6  आणि भा.दं.वि. कलम 506 अन्वये सचिन याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.