होमपेज › Sangli › मुख्यमंत्री 4 जूनला मनपा निवडणूक रणशिंग फुंकणार

मुख्यमंत्री 4 जूनला मनपा निवडणूक रणशिंग फुंकणार

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 10:23PMसांगली : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते उड्डाण मंत्री नितीन गडकरी  दि. 4 जून रोजी येथे  महापालिका निवडणुकीचे भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. येथील स्टेशन चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे, असे  पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. यासंदर्भात नियोजनासाठी आमराई क्‍लब येथे शुक्रवारी बैठक पार पडली. बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ प्रमुख उपस्थित होते. भाजप महापालिका निवडणुकीत 60 पेक्षा अधिक जागांवर यश मिळवेल, असा दावाही त्यांनी केला.

देशमुख म्हणाले, सांगलीत  1992 मध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यानंतर प्रथमच दि. 4 व दि. 5 जूनला खरे क्‍लब हाऊस येथे राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीस फडणवीस, गडकरी, तसेच राज्यातील पक्षाचे सर्व मंत्री  आणि अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. महापालिका मिशन फत्ते करण्यासाठी तेे एक शक्‍तिप्रदर्शनच असेल. ते म्हणाले, महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याद‍ृष्टीने युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. सब का साथ, सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानुसार विकासपर्वच सुरू आहे. कर्नाटकातही भाजपने परिवर्तन घडविले आहे. फक्‍त बहुमत सिद्ध होण्याची औपचारिकता आहे. सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेतही सत्तापरविर्तन होईल. 

देशमुख म्हणाले,भाजपची राज्यस्तरीय बैठक महापालिका निवडणुकीच्या वातावरण निर्मितीस पोषक  ठरेल. यावेळी भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी असे  सातशेपेक्षा अधिकजण उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचा प्रारंभ फडणवीस यांच्याहस्ते होईल.  यामध्ये दिवसभर  राज्य शासनाच्या विविध योजना, महापालिका निवडणूक या विषयांवर सविस्तर चर्चा होऊन ठराव होणार आहेत. दि. 5 रोजी ना. गडकरी यांचे समारोप समारंभात मार्गदर्शनपर भाषण होईल. 

पक्षप्रवेशाचा धडाका लवकरच

ते म्हणाले, अन्य पक्षातून अनेक आजी-माजी नगरसेवक  भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांचे पक्षप्रवेश लवकरच सुरू होतील. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत  राज्य कार्यकारिणी बैठकीदरम्यानही अनेकांचा प्रवेश होणार आहे. या निवडणुकीत महापालिकेत सत्तांतर निश्‍चित आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतरच शहराचा कायापालट होईल.  आरपीआय, शेतकरी संघटनेसह अनेकजणांशी चर्चा सुरू आहे. भाजप 60 पेक्षा अधिक जागांवर यश मिळवेल.

शिवारात जाणारे पहिले मुख्यमंत्री

देशमुख म्हणाले, आतापर्यंत जलयुक्‍त शिवाराचे सर्वात मोठे काम भाजपच्या सत्तेत झाले आहे. मुख्यमंत्री  फडणवीस यांनी जत तालुक्यातील जलशिवार योजनेच्या कामाची पाहणी केली. प्रत्यक्ष कामावर जाऊन जलसंधारण कामाची  पाहणी करणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत.  लोकचळवळ  वाढली पाहिजे यासाठी त्यांची ही धडपड आहे. यामुळेच  ऐन उन्हाळ्यात राज्यभर टँकर आणि चारा छावण्यमुक्‍त जिल्हे होऊ शकले आहेत.बैठकीस पक्षाचे निरिक्षक लक्ष्मण साऊजी, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, दीपक शिंदे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शहराध्यक्ष शरद नलावडे, श्रीकांत शिंदे, गणपतराव साळुंखे आदी उपस्थित होते.