Wed, Apr 24, 2019 12:00होमपेज › Sangli › मुख्यमंत्री फडणवीस आज इस्लामपुरात

मुख्यमंत्री फडणवीस आज इस्लामपुरात

Published On: Feb 12 2018 2:05AM | Last Updated: Feb 11 2018 11:39PMइस्लामपूर : वार्ताहर

सांगली जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी इस्लामपुरात येत आहेत. त्यांच्याबरोबर राज्य मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर  इस्लामपुरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

येथील पोलिस परेड मैदानावर रविवारपासून हा कृषी महोत्सव व दख्खन जत्रा सुरू झाली. याचे औपचारिक उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्र्यांचे कराड येथे विमानाने आगमन होणार आहे. तेथून ते इस्लामपूर येथील शासकीय विश्रामगृहावर येणार आहेत. त्यानंतर कृषी महोत्सवाचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर कृषी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी भोजनासाठी थांबणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी विजय कळम-पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा यांनी प्रदर्शनस्थळी भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. 500 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.