Thu, Feb 21, 2019 11:11होमपेज › Sangli › मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात मनपाची व्यूहरचना

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात मनपाची व्यूहरचना

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 11:21PMसांगली : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी येथे येत आहेत. त्यांच्या या दौर्‍यात भाजपच्या ‘मिशन महापालिका’ मोहिमेची  व्यूहरचना ठरणार आहे. यासाठी खासदार संजय पाटील यांनी माजी नगरसेवक विक्रम सावर्डेकर यांच्या घरी स्नेहभोजनाच्या निमित्ताने कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे.  या बैठकीत  भाजपमधील संभाव्य इनकमिंगसह विविध उपाययोजनांची चर्चा होणार आहे. मनपा निवडणुकीच्या नेतृत्वाच्या विषयावरून निर्माण झालेल्या नाराजीबद्दलही खल रंगण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून भाजपने निवडणुकीची व्यूहरचना सुरू ठेवली आहे. यासाठीच आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांसह विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. त्यातून विकासकामेही सुरू आहेत. परंतु, भाजपला शून्यातून एंट्री करावी लागणार आहे. 

आतापर्यंत झालेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात भाजपला म्हणावे तसे यश मिळेल, असे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे सत्तेसाठी  काँग्रेस, राष्ट्रवादीतील असंतुष्ट आणि बंडखोरांवर भाजपची भिस्त असेल. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे. त्यादृष्टीने गळही टाकण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, त्यामुळे  पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये  नाराजी  आहे. त्यामुळे  अंतर्गत संघर्षाची चिन्हे आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस रविवारी जिल्हा न्यायालय इमारत उद्घाटनाच्या निमित्ताने सांगली दौर्‍यावर येत आहेत. तेथून ते डिपेक्स प्रदर्शनास भेट देणार आहेत. या निवडणुकीसाठी पक्षाचे नेतृत्व आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे दिले आहे. मात्र, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे निवडणुकीची  प्रमुख सूत्रे  राहणार आहेत.