Tue, Jul 16, 2019 01:37होमपेज › Sangli › गोठा काम तपासणी, पेमेंटसाठी 7 दिवसांची मुदत

गोठा काम तपासणी, पेमेंटसाठी 7 दिवसांची मुदत

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 30 2018 11:16PMसांगली : प्रतिनिधी

बेळुंखी (ता. जत) येथील गोरख बजाबा केंगार यांच्या गोठा कामाची तपासणी करून अनुदान देण्याबाबत जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना 7 दिवसांची मुदत दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांच्या शेडचे (गोठा) अनुदान रखडल्याने गोरख केंगार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करतील असे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले होते. 

त्यासंदर्भात संपर्क साधला असता मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत म्हणाले,  केंगार यांच्या कामाची तपासणी करून अनुदानाची रक्कम देण्यास जतच्या गटविकास अधिकारी यांना सात दिवसांची मुदत दिली आहे. गोठ्याचे काम झालेले असेल व नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर अनुदानाची रक्कम देणे अनिवार्य आहे. अनुदानास विनाकारण विलंब झाल्यास दोषींवर कडक कारवाई होईल. दरम्यान केंगार यांनी यापूर्वी अनुदानासाठी जिल्हा परिषदेला पत्र देऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्या पत्रावरून जिल्हा परिषदेने जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना दीड महिन्यांपूर्वी कळवून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.