होमपेज › Sangli › रासायनिक खतांचा जिल्ह्यात बेसुमार वापर

रासायनिक खतांचा जिल्ह्यात बेसुमार वापर

Published On: May 13 2018 2:17AM | Last Updated: May 12 2018 11:39PMसांगली : शशिकांत शिंदे

शेती उत्पादन वाढीसाठी   जिल्ह्यात रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात रासायनिक खतांची मागणी 1 लाख 31 हजार टन होती. त्यापैकी 1 लाख 20 हजार 840 टन खताचा पुरवठा करण्यात आला. त्यात रासायनिक खताची सर्वाधिक मागणीही वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातून तर  सर्वाधिक कमी मागणी जत आणि आटपाडी तालुक्यातून आहे. दरम्यान रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतीचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्याशिवाय खताचा मानवासह इतर प्राण्यांवरही दुष्परिणाम होत आहेत. 

खतांचा वापर झपाट्याने वाढत असल्याची साक्ष महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाची आकडेवारी देत आहे. खत व कीटकनाशकांच्या वापराविषयी काही संकेत आहेत. त्यानुसार खताचा सरासरी वापर दर हेक्टरी 95 किलो ग्रॅमच्या आसपास असणे अपेक्षित आहे. मात्र  शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नातून रासायनिक खतांच्या वापरावरील नियंत्रण सुटत चालले आहे. 2007-08 या आर्थिक वर्षात प्रति हेक्टरी 109 किलो असलेला रासायनिक खतांचा वापर 2014-15 या वर्षात 147 किलोग्रॅमवर पोहोचला आहे. खतांची अतिरिक्त मात्रा जमिनीचा पोत बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. 

गेल्या आर्थिक वर्षांत जिल्ह्यात युरिया 52 हजार टन, डी.ए. पी. 13 हजार टन, एमओपी 11 हजार 780 टन, एस.एस. पी. 18 हजार 530 टन आणि एकूण एन.पी.के. खते 24 हजार 400 टनांची विक्री झाली. खत वापरात वाळवा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त असून    गेल्या आर्थिक वर्षात 16 हजार 410 टन खताचा वापर करण्यात आला. 

त्यानंतर मिरज तालुक्यात 14 हजार 620 तर पलूस तालुक्यात 14 हजार 880 टन वापर झाला. या तालुक्यातही ऊस आणि द्राक्षाचे क्षेत्र जास्त आहे. दुसर्‍या बाजूला द्राक्षाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या तासगाव तालुक्यात मात्र रासायनिक खते 10 हजार 420 टनाचा वापर झाला. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या आटपाडी तालुक्यात खतांचा वापर तुलनेत कमी आहे.  अती रासायनिक खत वापरामुळे क्षारपड जमिनीचे क्षेत्र वाढतच आहे.  मानवासहित सर्वच प्राणीमात्रावर परिणाम होत आहे. 

तालुकानिहाय रासायनिक खतांचा वापर(टन)

खरीप हंगाम 2017-18 मध्ये रासायनिक खतांची तालुकानिहाय केलेला पुरवठा असा ः  -वाळवा- 16हजार410, खानापूर-11 हजार 620, तासगाव-10हजार420शिराळा-10 हजार 370, पलूस- 14हजार880, मिरज- 14 हजार620, कवठेमहांकाळ - 12 हजार 40, कडेगाव-12 हजार130, जत- 9  हजार 740 , आटपाडी - 8 हजार 610 

रासायनिक खते, औषधामुळे कर्करोगाचा धोका?

गेल्या काही वर्षांत  कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि औषधांचा वापर होत असल्याने कर्करोगांचे रुग्ण वाढत असल्याची चर्चा आहे. हे एक कारण असू शकते. मात्र ठोस  त्याबाबत ठोस सांगता येणार नाही. रासायनशास्त्रातील तज्ज्ञांनी अभ्यास करण्याची गरज आहे,     - डॉ. विशाल गोसावी, कर्करोग तज्ज्ञ. 

रासायनिक खताचे प्रमुख दुष्परिणाम

पाण्याची गरज तीन पटीने वाढते.  रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्या लागतात.   रासायनिक खतांचे अंश पाण्यात उतरल्याने पाणी पिण्यायोग्य   राहिले नाही.  अनेकांना आरओ सिस्टीम बसवाव्या लागत आहेत. अन्न आणि पाण्याव्दारे रासायनिक खताचे अंश मानवी आणि इतर प्राण्याच्या शरीरात जात असल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.