होमपेज › Sangli › तीनही शहरांच्या सर्वच प्रवेशमार्गांवर चेकपोस्ट

तीनही शहरांच्या सर्वच प्रवेशमार्गांवर चेकपोस्ट

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 05 2018 10:43PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत  आचारसंहिता काळात कसल्याही प्रकारचे गैरव्यवहार घडू नयेत. यासाठी सांगली-मिरज- कुपवाड या तीनही शहरांच्या आठ प्रवेशमार्गांवर बााहेरून येणारी वाहने तपासणीसाठी चेकपोस्ट उभारण्यात येणार आहेत. ही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी प्रभागवार भरारी पथके, खर्चावर नियंत्रणासाठी पथके यासह विविध समित्या नियुक्‍त केल्याचे त्यांनी सांगितले.

खेबुडकर म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.  बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी सहा ठिकाणी निवडणूक कार्यालये कार्यरत आहेत. सर्वच निवडणूक अधिकार्‍यांची  दररोज बैठक घेऊन मी कामकाजाचा आढावा घेत आहे. प्रत्येक निवडणूक अधिकार्‍याकडे  25 कर्मचारी आहेत.मतदान केंद्रांवर सुमारे तीन हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. ते  नियुक्‍ती आदेश लवकरच दिले जातील.

ते म्हणाले, निवडणूक कार्यकाळात तीनही शहरात येणार्‍या सर्व वाहनांची तपासणी करण्यासाठी  आठ ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत.  मतदानासाठी नागरिकांची आवक, आर्थिक उलाढाल, कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी हे चेकपोस्ट  तपासणी करणार आहेत. सांगलीवाडी टोल नाका, शिवशंभो चौक-बायपास रस्ता, माधवनगर नाका, पंढरपूर नाका-मिरज, म्हैसाळ रस्ता नाका-मिरज, अंकली फाटा-सांगली, सुभाषनगर फाटा-मिरज, तानंग फाटा या ठिकाणी ही चेक पोस्ट  असतील. तिथे पाच पोलिस आणि मनपाचे अधिकारी, कर्मचारी  असतील.  निवडणूक पारदर्शी पार पडावी. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रभागनिहाय नऊ भरारी पथके नियुक्त  करण्यात आलेली आहेत. गरज भासल्यास प्रभागनिहाय आणखी पथके तयार करू. ते म्हणाले, शहरात 544 मतदान केंद्रे असतील. सर्व प्रभागांच्या प्रभागनिहाय मतदार याद्या महापालिकेच्या वेबसाईटवर  आहेत. महापालिकेची स्वतंत्र वेबसाईट,फेसबुक, ट्विटर अशी ऑनलाईन यंत्रणा सुरू आहे. बुधवारपासून ऑनलाईन अर्ज भरणा सुरू झाला आहे. त्यानुसार 18 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. परंतु अनामत रक्कम भरून त्यांच्या प्रिंट प्रती जोपर्यंत दाखल होत नाहीत तोपर्यंत उमेदवारांचे अर्ज दाखल समजण्यात येणार नाहीत. खेबूडकर म्हणाले, उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांकडे दाखल करताना उमेदवारांसोबत  केवळ चार व्यक्तींना परवानगी आहे. पाचवी व्यक्ती आली तर निवडणूक आचारासंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.  यासाठी सर्व निवडणूक कार्यालयात 20 सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज भरताना राजकारण ,गडबड  खपवून घेतली जाणार नाही.

शक्‍तिप्रदर्शन करणार्‍यांवर गुन्हे दाखलचे आदेश

खेबुडकर म्हणाले, गेल्या आठवड्यात अनेक राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. राजकीय पक्षांनी मुलाखतींच्या प्रक्रियेसाठी परवानगी घेतली होती. परंतु इच्छुकांना शहरात शक्‍तिप्रदर्शन करण्यासाठी हुल्लडबाजी करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांनी बेकायदा शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढल्या  त्यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यात  त्याचे पुरावे आहेत. याबाबत जिल्हा पोलिसप्रमुख, अप्पर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक यांंना सूचना दिल्या आहेत.

राज्य निवडणूक आयुक्‍त 16 रोजी सांगलीत

खेबुडकर म्हणाले, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया दि.16 जुलैला सांगली दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते  निवडणूक यंत्रणेची तपासणी करतील.तसेच निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत. यासंदर्भात अधिकार्‍यांची बैठक  घेतील. तसेच नागरिकांशीही संवाद साधतील.निवडणूक पारदर्शी व्हावी, 100 टक्के मतदान व्हावे यासाठी जनजागृतीच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत. यानुसार शहरात मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.