Mon, May 27, 2019 01:26होमपेज › Sangli › हृदय शस्त्रक्रिया तपासणीसाठी ४२ बालके मुंबईला

हृदय शस्त्रक्रिया तपासणीसाठी ४२ बालके मुंबईला

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 11:45PMसांगली : प्रतिनिधी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 42 बालकांना हृदय शस्त्रक्रिया तपासणीसाठी बुधवारी मुंबईला रवाना करण्यात आले. या बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, मुख्यमंत्री सहायता निधीतून मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जातो. शून्य ते अठरा वर्षे  वयोगटातील बालके, मुलांची आरोग्य तपासणी व उपचार केले जातात. संदर्भित केलेल्या बालके, मुलांवर आवश्यक त्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. तपासणीमधून गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियेकरिता संदर्भित केलेल्या 42 बालकांना बुधवारी एसआरसीसी हॉस्पिटल मुंबई येथे शस्त्रक्रिया पूर्व तपासणीसाठी पाठविण्यात आले. बालके व पालकांसाठी खास दोन एस. टी. बसेसची सुविधा उपलब्ध केली होती.   

हृदय शस्त्रक्रिय तपासणीसाठी 42 बालकांना पालकांसह मुंबईला पाठविले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, डॉ. मिलींद पोरे, डॉ. शहनावाज नाईकवाडे, डॉ. संतोष चौधरी उपस्थित होते. 

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी या उपक्रमासाठी प्रयत्न केले. सन 2013 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.