Wed, Feb 20, 2019 09:18होमपेज › Sangli › ‘त्या’ चौघांना मलेशियात तीन महिने कारावास शिक्षा

‘त्या’ चौघांना मलेशियात तीन महिने कारावास शिक्षा

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:55AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झालेल्या त्या चार युवकांना बेकायदा वास्तव्य केल्याचा ठपका ठेवत तेथील न्यायालयाने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अ‍ॅड. जसओन वोई यांनी युवकांची बाजू मांडली. याप्रकरणी न्यायालयाने चौघांनाही प्रत्येकी दीड लाख रुपयांचा दंड केला होता. मात्र, दंडाची रक्‍कम न भरल्याने तीन महिन्यांची शिक्षा दिल्याचे पेठ (ता. वाळवा) येथील नामदेव कुंभार यांनी सांगितले.  

गुरुनाथ इरण्णा कुंभार (शिरवळ, ता. अक्‍कलकोट), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवडी, जि. अहमदनगर), दीपक माने (रा. हुन्‍नर, जि. सोलापूर), समाधान धनगर (रा. जवळगाव) अशी शिक्षा झालेल्या युवकांची नावे आहेत. सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ पवारसह त्याचा साथीदार धीरज पाटील यांनी मलेशियात नोकरीच्या आमिषाने पाठवून चार युवकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ गेल्या पंधरा दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे मलेशियात अडकलेल्या युवकांच्या पालकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता.पालकांनी मलेशियातील काही मित्रांच्या मदतीने अ‍ॅड. वोई यांची नियुक्‍ती केली होती. चौघेही या आधीच एक महिना कारागृहात असल्याने त्यांना आता केवळ दोन महिनेच कारागृहात काढावे लागणार असल्याचे गुरुनाथ कुंभारचे मेहुणे नामदेव कुंभार यांनी सांगितले.