Tue, Jun 18, 2019 20:20होमपेज › Sangli ›   पोलिस ‘त्या’ चौघांचे जबाब घेणार

  पोलिस ‘त्या’ चौघांचे जबाब घेणार

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:39PMसांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक झालेले ते चार तरूण पाच दिवसांपूर्वी भारतात सुखरूप परतले आहेत. दरम्यान, याप्रकरणात पोलिसपुत्र कौस्तुभ पवार आणि एजंट धीरज पाटील यांनी केलेल्या फसवणुकीबाबत त्यांचे लवकरच जबाब घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.  

गुरुनाथ इरण्णा कुंभार (शिरवळ, ता. अक्कलकोट), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवडी, जि. अहमदनगर), दीपक लिंबाजी माने (रा. हुन्नर, जि. सोलापूर), सदानंद धनगर (रा. जवळगाव) अशी या युवकांची नावे आहेत. पवार आणि धीरज पाटीलने प्रत्येकी दीड लाख रूपये घेऊन नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केली होती. त्यावेळी त्यांना मलेशियात वर्किंग व्हिसा न दिल्याने त्यांना तेथील पोलिसांनी अटक केली होती. बेकायदा वास्तव्याप्रकरणी चौघांनाही मलेशियातील न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. 

दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर युवकांच्या पालकांनी परराष्ट्र मंत्रालयासह मलेशियातील भारतीयांमार्फत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना यश आले नाही. तीन महिन्यांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर चौघेही प्रजासत्ताकदिनी भारतात परतले. प्रथम ते हैदराबादला आले. तेथून इस्लामपूरच्या नामदेव कुंभार यांनी त्यांना अक्कलकोटला नेले. तेथून गुरुनाथव्यतिरिक्त अन्य मुले त्यांच्या गावी परतली. पोलिसपुत्र पवार आणि एजंट धीरजने त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना ट्रॅव्हल व्हिसावर मलेशियात पाठविले होते. तेथे गेल्यावर त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी देण्यात आली. त्या दरम्यान त्यांच्या ट्रॅव्हल व्हिसाची मुदत संपली. त्यांना वर्किंग व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना 14 नोव्हेंबरला मलेशियातील पोलिसांनी अटक केली. त्यानंतर 12 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. 

शिक्षा संपल्यानंतर त्यांना बुकीट जेलच्या इमिग्रेशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयातर्फे त्यांच्या परतीची फाईल तयार करण्यात आली. गुरुनाथचे नातेवाईक नामदेव कुंभार यांनी चौघांच्या विमानाची तिकीटे काढली. 

पवार, पाटील न्यायालयीन कोठडीत

दरम्यान, नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा पोलिसपुत्र कौस्तुभ पवार, एजंट धीरज पाटील अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना अद्यापही जामीन मंजूर झाला नसल्याचे सुत्रांनी सांगितले.