Fri, Jul 19, 2019 23:05होमपेज › Sangli › कोथळे खून; आरोपपत्र दोन दिवसांत दाखल

कोथळे खून; आरोपपत्र दोन दिवसांत दाखल

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 03 2018 12:33AMसांगली ः प्रतिनिधी

अनिकेत कोथळेच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीने गतीने पूर्ण केला आहे. आता बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह संशयितांविरोधात दोषारोपपत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत दोषारोपपत्र दाखल होणार आहे.

अनिकेतचा खून दि. 6 नोव्हेंबरला रात्री करण्यात आला होता. दि. 7 रोजी कावळेसाद येथे त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. मंगळवारी या घटनेला तीन महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्यापूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीआयडीच्या अधिकार्‍यांची तयारी सुरू आहे. याप्रकरणी यापूर्वीच  युवराज  कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, गाडीचालक राहुल शिंगटे, झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे यांना अटक केली आहे. 

प्रत्यक्षदर्शी, परिस्थितीजन्य, वैद्यकीय आणि तांत्रिक पुरावे सीआयडीच्या पथकाने जमा केले आहेत. त्याशिवाय आतापर्यंत 55 हून अधिक जणांचे जबाबही नोंदविले आहेत. युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी पोलिस कोठडीत केलेल्या मारहाणीतच अनिकेतचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.