Thu, Jul 18, 2019 02:09होमपेज › Sangli › मनपातील सत्तांतराचे नामदार चंद्रकांत पाटील शिल्पकार

मनपातील सत्तांतराचे नामदार चंद्रकांत पाटील शिल्पकार

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 10:45PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादीचा मजबूत गड असलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे सत्ताकेंद्र भाजपने दे-धक्का तंत्राने हिसकावून घेतले. भाजपच्या केंद्र, राज्यातील विकासात्मक वाटचालीच्या जोरावर झालेल्या या सत्तांतराचे शिल्पकार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील  ठरले.

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची शक्‍ती एकवटली होती. त्याआधारे विरोधकांनी पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा  दावा केला होता; परंतु त्यांचा आत्मविश्‍वास फोल ठरवत ना. पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि आश्वासक  चेहरा असलेल्या आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक जिंकली. महापालिकेच्या राजकीय पटलावर  काँग्रेसच्या सत्तेचा सूर्य कधीही मावळणार नाही, असे मानले जात होते.परंतु ना. पाटील यांच्या व्यूहरचनेनुसार पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपने सत्तेची अनेक केंद्रे काबीज केली होती. आता सांगली जिल्ह्यात महापालिकेतील काँग्रेसचे एकमेव सत्ताकेंद्रही भाजपने ताब्यात घेतले आहे. 

सांगली जिल्हापरिषद, पाच पंचायत समित्या, तासगाव आणि इस्लामपूर नगरपालिका तसेच  अनेक ग्रामपंचायतींवरही भाजपचा झेंडा यापूर्वी फडकला आहे. केवळ महापालिकेचे सत्ताकेंद्र तेवढे भाजपपासून दूर होते. ते टार्गेट ठेवून ना. पाटील गेल्या दोन-अडीच वर्षांपासून महापालिका क्षेत्रात व्यूहरचना करीत होते.  ना. पाटील यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, माजी उपमहापौर  शेखर इनामदार, दीपक शिंदे, नीता केळकर  यांचा समावेश असलेली  कोअर कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीच्या माध्यमातून   त्यांनी मोर्चेबांधणी केली होती. 

महापालिकेतील काँग्रेसच्या 20 वर्षांच्या कारभारानंतरही शहराचा कोणताही विकास झालेला नाही, अशी भावना तयार झाली होती.नागरी सुविधांचाही बोजवारा उडाला होता.  भाजपचे यामध्ये बदल घडवू शकेल असे लोकांमध्ये रुजवण्यासाठी ना. पाटील यांनी  दोन्ही आमदार, खासदारांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवले होते. राज्य शासनाकडून रस्त्यांसाठी निधी मिळवून दिला होता. त्यामुळे बर्‍याच वर्षांनंतर शहरातील अनेक भागात चांगल्या रस्त्यांचा नागरिकांनी सुखद अनुभव घेतला.

ना. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू होती. त्यांनी या संदर्भात ‘मायक्रोप्लॅनिंग’ केले होते. शहरातील सर्वच स्तरात जाऊन चर्चा सुरू होती. शहर विकासासाठी काय हवे, हे जाणून घेण्याचे काम सुरू  होते.त्याचवेळी अन्य पक्षांतून अनेक आजी-माजी नगरसेवक, प्रभावी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार भाजपकडे यावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिवाय आमदार गाडगीळ व  आमदार  खाडे यांच्या माध्यमातून  गुंठेवारी भागात सुधारणांना सुरुवात केली. ‘वन बूथ-थर्टी यूथ’ अशी संघटनात्मक बांधणी करण्यात आली होती. नव्या-जुन्या चेहर्‍यांचा मेळ घालून कोअर कमिटीने शहरात चांगले उमेदवार निवडले. 

विरोधकांवर टीका नाही; विकासाचा अजेंडा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवडणुकीत   केंद्र व राज्य सरकारच्या कामावर टीकेची झोड उठवली.महागाई, जीएसटी, नोटाबंदीसह विविध  मुद्देही प्रचारात मांडले होते.  भेटवस्तू, पैशांचा वापर असे आरोपही केले होते. परंतु त्या टिकेला  ना.चंद्रकांत पाटील यांनी कोठेही उत्तर दिले नाही. महापालिकेतील आघाडीच्या कारभाराबद्दल त्यांनी  टोकाची टीकाही केली नाही. उलट शहर विकासाचा अजेंडा समोर ठेवला. जनतेला शहर चांगले बनविण्याचे आवाहन केले. त्यासाठी सत्ता परिवर्तन आवश्यक आहे, असे सांगितले .