होमपेज › Sangli › ‘चंद्रकांतदादा कोल्हापूरचा हिसका विसरला का?’

‘चंद्रकांतदादा कोल्हापूरचा हिसका विसरला का?’

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 10 2018 10:44PMसांगली ः प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत भाजपला उमेदवारही मिळेनात. सर्व्हेतून पराभव स्पष्ट दिसत असताना भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा सांगली महापालिका जिंकण्याची भाषा करत आहेत. तुम्ही कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने दाखविलेला हिसका विसरला का,  असा सवाल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. 

ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी आता खुलेआम भेटवस्तू वाटा अशा वल्गना ना.पाटील करीत आहेत. निवडणूक आयोगाचे सर्व नियम धाब्यावर बसवून भाजप निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा कशा प्रकारे वापर करीत आहे, हे स्पष्ट झाले आहे. अशा पद्धतीने भाजप देश कोठे नेऊन ठेवणार आहे? शुक्रवारी भाजपच्या बूथ कमिटी पदाधिकारी मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना एक लाख भेटवस्तू वाटप करा, असा संदेश दिला होता. याचा काँग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही निषेध करीत आहोत.

ते म्हणाले, भूलथापा, खोटी आमिषे दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपला राज्यारभार चालविता आला नाही. उलट देशाचे वाटोळेच केले आहे. त्यामुळे त्या पक्षाला घरघर लागली आहे. भाजप  सर्वच क्षेत्रातील निवडणुकांत पराभूत होऊ लागले आहे. 

पाटील म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपनेच केलेल्या  सर्व्हेक्षणात काँग्रेस क्रमांक एकवर, राष्ट्रवादी दुसर्‍या स्थानी आहे. भाजपला हाताच्या बोटावर मिळतील असा अंदाज पुढे आला आहे. त्यामुळे  त्या पक्षाच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे. त्यासाठीच आता मतदारांना भेट स्वरूपी वस्तू देऊन मते विकत घेण्याचा हा अत्यंत  लाजीरवाणा प्रयत्न आहे. यावरून भाजपचे खरे रूप जनतेसमोर येऊ लागले आहे.

ते म्हणाले, भाजपला घरघर लागल्याने कोणीच भाजपमध्ये प्रवेश करायला तयार नाहीत. असे असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा पसरवत आहेत.  अशाने त्यांना काहीच साध्य होणार नाही.