सांगली : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा प्रतिसाद आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेलाही पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच सर्व विरोधक आमच्यावर उमेदवारी विकत घेतल्याचे आरोप करीत आहेत, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत लगावला.
ते म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेनेची अवस्था ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले, भ्रष्टाचारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रोखण्यासाठी आमच्यावर टीका करूनही समविचारी पक्षांना दारे खुलीच आहेत.गेल्या 20 वर्षांतील भ्रष्ट कारभाराने जनता हैराण झाली आहे. त्यामुळेच जनतेत सत्ताधारीविरोधी वातावरण आहे. त्यामुळेच भाजप हा सक्षम पर्याय त्यांनी निवडला आहे. त्याच आधारे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
अर्थात आमच्याकडे इच्छुक मोठ्या संख्येने आहेत. पण उमेदवारी 78 जणांनाच मिळेल. त्यामुळे उमेदवारी न मिळणार्यांनी अधिक काळ नाराज न राहता पक्षाच्या कामाला लागावे. पुढे संधी मिळतीलच. सांगली व जळगाव महापालिका निवडणुकीतील विजय हा लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला बुस्टर डोसच ठरेल.
विधानपरिषदेचा फैसला केंद्राकडे
विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत पाटील म्हणाले, भाजपच्या वाट्याला 5 जागा आहेत. अर्थात यामधील एक जागा भाजपमधूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना दिली होती. आता त्यांनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर जागा मागितली आहे. ती द्यायची की नाही याचा फैसला केंद्रीय कार्यकारिणीच करेल. काही अडचण येऊ नये यासाठीच पृथ्वीराज देशमुख यांचा सहावा अर्ज भरलेला आहे.
उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करू
ना. पाटील म्हणाले, भाजप उमेदवारांची यादी सोमवारपयर्र्ंत आम्ही निश्चित करू. त्यानंतर तत्काळ अर्ज भरण्यासही सुरुवात होईल. जे समविचारी सोबत येतील, त्यांनाही जागा देऊ. नव्याने येणार्यांना ऐनवेळी उमेदवारी देऊ, पण प्रसंगी भाजप सर्वच 78 जागांवर लढण्याची तयारी ठेवणार आहे.