Fri, Jul 19, 2019 07:35होमपेज › Sangli › चंद्रकांतदादा भाजप आघाडीचे संख्याबळ अजमावणार

चंद्रकांतदादा भाजप आघाडीचे संख्याबळ अजमावणार

Published On: Aug 25 2018 1:17AM | Last Updated: Aug 25 2018 1:17AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलासाठी सत्ताधारी भाजप आघाडीतील काही नेतेमंडळी व सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र भाजप आघाडी नेत्यांमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारावरून गैरमेळ आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे भाजप आघाडी एकसंघ आहे का, हे आजमावून पदाधिकारी बदलाबाबत निर्णय घेणार असल्याचे संकेत आहेत. 

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांना सव्वा वर्षे झाली आहेत. अडीच वर्षांची पहिली टर्म संपण्यास आता एक वर्ष उरले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदल व्हावा यासाठी इच्छुकांनी जोर धरला अहे. 

अध्यक्षपदासाठी भाजपमधून खासदार संजय पाटील यांचे चुलते डी. के. पाटील तसेच पप्पू डोंगरे प्रबळ इच्छुक आहेत. जत तालुक्यातूनही भाजप सदस्यांनी अध्यक्षदासाठी दावेदारी केली आहे. भाजप आघाडीत भाजप, शिवसेना, रयत विकास आघाडी, अजितराव घोरपडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश आहे. 

या आघाडीतील नेत्यांमध्ये एकमत नाही. गैरमेळाचे वारे जोरात वाहत आहे. भाजपमध्ये खासदार संजय पाटील व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यातील गटबाजी सर्वश्रुत आहे. शिवसेना नेते आमदार अनिलराव बाबर आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशीही खासदार गटाचे मतभेद आहेत. त्यामुळे खासदार समर्थकाला अध्यक्षपद मिळू द्यायचे नाही, अशा हालचाली भाजप आघाडीतील नेत्यांमध्ये सुरू असल्याची चर्चा जोरात आहे. त्याला  सुत्रांनी दुजोराही दिला आहे. पदाधिकारी निवडीवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना काय पवित्रा घेणार याचाही नेम नाही. त्यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार आणि आघाडीचे संख्याबळ अजमावूनच राजीनाम्यांचा निर्णय होईल, अशी  चर्चा आहे. 

दरम्यान भाजप आघाडीत बिघाडी झाली तर विरोधकांमधील काही सदस्यांना गैरहजर ठेवून भाजपचे बहूमत घडवून आणू, असा दावा काहींचा असल्याची चर्चा आहे. पण या जमवाजमवीला भाजपमधूनच विरोध असल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद पदाधिकारी बदल औत्सुक्याचा ठरत आहे.