Wed, Apr 24, 2019 16:28होमपेज › Sangli › चांदोलीमधील वनपाल आर. के. पोवार निलंबित  

चांदोलीमधील वनपाल आर. के. पोवार निलंबित  

Published On: Mar 07 2018 11:28PM | Last Updated: Mar 07 2018 11:28PMवारणावती  : वार्ताहर 

 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणार्‍या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेतील भ्रष्टाचारप्रकरणी  चांदोलीचे वनपाल आर. के. पोवार यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका विनिता व्यास यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात सहभागी असणार्‍या इतरांचीही चौकशी सुरू असून त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, उखळू (ता. शाहूवाडी) येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणार्‍या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेत गैरव्यवहार  झाला आहे. या योजनेत ग्रामस्थांना अनुदानावर गॅसवाटप करण्यात येते. यासाठी 25 टक्के रक्‍कम लाभार्थींचा खर्च व 75 टक्के रक्‍कम शासनाने द्यायची असते; पण 100 टक्के रक्‍कम ग्रामस्थांकडून गोळा करून त्यातील 75 टक्के रकमेचा अपहार झाला आहे. ही रक्‍कम मोठी आहे. 

त्यामुळे याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी उखळू ग्रामस्थांनी वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावर गेल्या महिन्यात मोर्चा काढला  होता.  त्यावेळी या मागणीची पूर्तता करू, असे लेखी आश्वासन संबंधित अधिकार्‍यांनी दिल्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला होता. उखळूचे सरपंच राजाराम मुटल व हरिश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर संबंधित अधिकार्‍यांनी तात्काळ  चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या चौकशी अहवालात वनपाल पवार दोषी आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत आहे.गॅस एजन्सी तसेच उखळू येथील जन वन योजनेतील सर्व सदस्य यांचीही चौकशी सुरू आहे. त्यात जे दोषी आढळतील  त्यांच्यावरही गुन्हे दाखल करणार  असल्याचे त्यांनी  सांगितले.