होमपेज › Sangli › ‘चांदोली’चा विकास कागदावरच! 

‘चांदोली’चा विकास कागदावरच! 

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 8:23PMवारणावती : आष्पाक आत्तार

‘चांदोली’वर मुक्तहस्ताने निसर्गसौंदर्याची उधळण झाली आहे. असंख्य पर्यटक चांदोलीला भेट देतात. मात्र कंधारचा धबधबा, प्रचितगड, राम नदी, कलावंतीणीची विहीर अशी अनेक ऐतिहासिक स्थळे अजूनदेखील दुर्गम भागात आहेत. सोयी- सुविधांच्या अभावामुळे या दुर्गम भागात जाता येत नसल्याने पर्यटक नाराज होतात. 

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या चांदोली परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने नियोजनबद्ध विकास होण्याची गरज आहे. त्यातून  स्थानिक तरूणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण होईल.  पर्यटकांनाही पर्यटनाचा आनंद लुटता येईल. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.

सन 1990 मध्ये राज्य शासनाने ‘चांदोली’चा पर्यटन विकास व्हावा यासाठी धरणाच्या डाव्या बाजूस 1 लाख 30 हजार चौरस मीटर जागेत लँडस्केपिंग, वसंतदादांचा पुतळा, आकर्षक बाग, कारंजे बसवण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला  सन 1995 मध्ये 1.28 कोटी रुपयांची  मंजुरीही मिळाली आहे. मात्र आज अखेर 28 वर्षे हा प्रस्ताव  कागदावरच आहे.  चांदोली व्याघ्र प्रकल्प रखडला आहे.  

युनेस्कोने ‘चांदोली’स जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सहभाग केला. ‘चांदोली’च्या विकासाच्या  शासन,  वारंवार घोषणा करते. नेतेही आश्वासनांची खैरात करतात. आता जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांचे ‘चांदोली’कडे लक्ष वेधले आहे. यामुळे या भागाच्या विकासाला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.