Fri, Jul 19, 2019 13:46होमपेज › Sangli › वाकुर्डे सिंचन योजना पूर्णत्वाचे आव्हान

वाकुर्डे सिंचन योजना पूर्णत्वाचे आव्हान

Published On: Apr 07 2018 2:04AM | Last Updated: Apr 06 2018 10:11PMशिराळा : विठ्ठल नलवडे

शिराळा-वाळवा तालुक्यातील वरदायी ठरणारी वाकुर्डे बुद्रूक उपसा जलसिंचन योजना रखडली आहे. तर योजनेवरून सत्ताधारी आणि  विरोधकांत  श्रेयवादाचा कलगीतुरा रंगू लागला आहे. दरम्यान, या योजनेतून बंदिस्त पाईपलाईनमधून 52 कोटींचा  निधी मंजूर झाला आहे. या कामाची निविदा देखील निघाली आहे. तरी देखील सरकारपुढे ही योजना पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

सध्या मानकरवाडी तलावात वाकुर्डेचे पाणी आले आहे. जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांनी पुढच्या वर्षी वाकुर्डेचे पाणी रेठरेधरण, कार्वेपर्यंत येणार असल्याची घोषणा केली. परंतु  निधीअभावी वाकुर्डेचे पाणी कार्वेपर्यंत आले नाही. आमदार शिवाजीराव नाईक यांचा योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र सरकारकडून दिरंगाई होत आहे.

पाणी बंद पाईपमधून जाणार...

या योजनेच्या कालव्यांच्या गळतीचा प्रश्‍न वारंवार निर्माण होत आहे. शेतकर्‍यांची जमीन कालव्यासाठी संपादित करावी लागते आहे. त्यामुळे आता वाकुर्डेची पाणी वितरणाची पुढील  व्यवस्था  बंद पाईपमधून होईल, असा सरकारने  निर्णय घेतला आहे. 

सन 2000 पासून वाकुर्डेची कामे सुरू करण्यात आली.  सन 2004-5 मध्ये डोंगराळ क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत 25 कोटी मिळाले.  या योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता दि. 19 ऑक्टोबर 1998. खर्च 109.68 कोटी रुपये. लाभ क्षेत्र शिराळा तालुका- 16 हजार 380 हेक्टर, वाळवा तालुका- 7290 हेक्टर, कराड तालुका- 2200 हेक्टर. एकूण- 15775 हेक्टर लाभ क्षेत्र.

मात्र क्रमाक्रमाने वाकुर्डे बुद्रूक योजनेचा खर्च वाढत गेला. तर निधी पुरेसा मिळाला नाही. त्यामुळे कामे थांबली. ठेकेदाराचे पैसे अडकले. कामे बंद पडली. 25 कोटी मिळाल्यावर पुन्हा कामे सुरू झाली. सन 2004 मध्ये या योजनेला सुधारित मान्यता मिळाली. त्यावेळी  332.31 कोटींवर खर्चांचा अंदाज पोहोचला तर लाभक्षेत्र 19 हजार 505 हेक्टर झाले. द्वितीय प्रशासकीय मान्यतेनंतर  541.01 कोटी खर्चांचा अंदाज तर अपेक्षित लाभक्षेत्र झाले 28 हजार 35 हेक्टर.

ही योजना त्वरित व्हावी निधी मिळावा यासाठी विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख, आमदार जयंत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांनी  मुंबई येथे वारंवार बैठका घेतल्या. त्यातून गावांची संख्या वाढली असल्याचे चित्र आहे.

बंद पाईपलाईनसाठी निधी मंजूर 

वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेच्या बंद पाईपलाईन कामासाठी 50.26 कोटी निधी मंजूर झाला असून कामाच्या निविदा निघाल्या आहेत. यात आता 11.30 किलोमीटर लांबीची कामे होणार आहेत. यासाठी  15 महिन्यांची मुदत आहे. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी सांगितले. यावेळी जि. प. चे माजी सदस्य रणधीर नाईक, उदयसिंगराव नाईक आदी उपस्थित होते.

 

Tags : sangli, sanlgi news, Wakurde,  Irrigation Scheme, Challenge,