Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Sangli › आता बंडखोरांच्या माघारीचे काऊंटडाऊन

आता बंडखोरांच्या माघारीचे काऊंटडाऊन

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 16 2018 12:16AMसांगली : प्रतिनिधी

महापलिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीय उमेदवारांसह नेत्यांसमोरही आता तब्बल 485 अपक्षांचे आव्हान ठाकले आहे. मंगळवारपर्यंत (दि. 17) अर्ज माघारीची मुदत आहे. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी आता नेत्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रविवारीही अनेक नेत्यांनी निष्ठावंत नाराजांना भेटून थांबण्यासाठी साकडे घातले. सोमवारी आता यादृष्टीने निर्णायक दिवस आहे. यातून मिळणार्‍या यश-अपयशावरच सर्वच पक्षांच्या मतांची आणि यशाची गणिते ठरणार आहेत. त्यादृष्टीने आता माघारीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

येत्या 1 ऑगस्ट रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी आघाडी, जिल्हा सुधार समिती, डावी आघाडी आदी पक्षांनी मैदानात उडी घेतली आहे. त्यानुसार सर्वपक्षीय तब्बल 821 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले. यामध्ये सर्व पक्षांकडून 236 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच 485 अपक्षांपैकी अनेकांनी  बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. यामध्ये अपक्षांचे नेतृत्व करीत राजेश नाईक यांनी अपक्षांची महाआघाडी करून निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.  त्यानुसार सर्वच पक्षांकडून प्रचाराचे नारळही फुटले. 

आघाडीतील जागावाटपामुळे नाराजांचे प्रमाण मोठे आहे. दुसरीकडे भाजपकडूनही उमेदवारी नाकारल्याने कधी नव्हे एवढी नाराज अपक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामध्ये काँगे्रसकडून माघारीसाठी समजोता घालण्यात काँग्रेसनेते स्व. मदन पाटील, डॉ. पतंगराव कदम यांची उणीव आहे. त्यामुळे आमदार डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवानेते विशाल पाटील आदींनी माघारीसाठी नाराजांना भेटून साकडे घातले. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, यांच्यासह स्थानिक नेत्यांनीही नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  

भाजपकडूनही खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, दिनकर पाटील, शेखर इनामदार आदींनीही प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.  आता माघारीसाठी सोमवारचा दिवस आणि रात्र उरली आहे. त्यादृष्टीने नेत्यांचेही आणि माघारीचेही काऊंटडाऊन सुरू झाले आहे. मंगळवारी कोण-कोण माघार घेणार, यावर सर्वच पक्षांच्या मतांची गणिते ठरणार आहेत.