Mon, May 27, 2019 07:16होमपेज › Sangli › सभापती बदल : भाजपमध्ये मतभेद?

सभापती बदल : भाजपमध्ये मतभेद?

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 11:14PMमिरज : प्रतिनिधी

मिरज पंचायत समितीत सभापती व उपसभापती बदलाबाबत भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटास सभापती पद देण्यास खासदार संजय पाटील यांच्या गटाने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सभापती जनाबाई पाटील यांचा राजीनामा लांबणीवर पडला आहे.पंचायत समितीत भाजपने दोन अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. त्यावेळी पदाधिकार्‍यांत बदल करण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता. मात्र सव्वा वर्षानंतर काही सदस्यांकडून सर्वांना संधी देण्याच्या दृष्टीने पदाधिकार्‍यांमध्ये बदल करावा, अशी मागणी सुरू झाली होती. 

महापालिका निवडणुकीनंतर आमदार सुरेश खाडे यांनी भाजपचे 10 व पाठिंबा दिलेले 2 अशा 12 सदस्यांची बैठक घेऊन सभापती  पाटील व उपसभापती  धामणे यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. सभापती  पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडे  घोरपडे यांच्या गटाच्या शालन भोई यांना सभापतीपद द्यावे लागणार आहे.  घोरपडे

भाजपमध्ये असले तरी खासदार  पाटील व त्यांचा तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील राजकारणात संघर्ष आहे. त्यामुळे खासदार गटाने घोरपडे यांच्या गटास सभापतीपद देण्यास विरोध दर्शवला आहे.खासदार पाटील यांच्या विरोधामुळे सभापती पाटील यांचा चार दिवसांपूर्वी होणारा राजीनामा लांबणीवर पडला आहे. भाजप आणि विरोधी काँग्रेस गटात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, सभापती  पाटील यांनी पक्षाने आदेश दिल्यानंतर राजीनामा देऊ,  असे सांगितले.

मिरज पंचायत समितीत भाजप 10, काँग्रेस 7, राष्ट्रवादी काँग्रेस 2, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, अपक्ष 1 आणि घोरपडे गट 1 असे संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजपला अपक्ष 1 आणि घोरपडे गटाचे 1 यांचा पाठिंबा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेसबरोबर आहे. भाजपला काठावरचे बहुमत आहे. सत्ता टिकविण्यासाठी पाठिंबा दिलेल्या दोन्ही सदस्यांना पदाधिकारी करावेच लागणार आहे.  खासदार पाटील यांनी घोरपडे गटास सभापतीपद देण्यास विरोध दर्शविला असल्याची चर्चा आहे.  पदाधिकारी बदलाचा पेच सत्ताधारी भाजपसमोर निर्माण झाला आहे.