Thu, Jul 18, 2019 10:08होमपेज › Sangli › लूटमार, चोर्‍या रोखण्याचे मोठे आव्हान 

लूटमार, चोर्‍या रोखण्याचे मोठे आव्हान 

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 17 2018 11:56PMसांगली : अभिजित बसुगडे

शहरात दोन दिवसांपूर्वीच एकाच रात्री सातजणांना चाकू आणि तलवारीचा धाक दाखवत लुटण्यात आले. गेल्या महिन्यातही एकाच रात्री पाचजणांना लुटण्यात आले होते. त्यातील संशयितांना अद्याप अटक झाली नसतानाच या ताज्या घटनांमुळे चोरट्यांनी पोलिसांसमोरच मोठे आव्हान निर्माण केले आहे. या घटनांमुळे सांगली शहर चांगलेच हादरले आहे. तर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग, घरफोड्या, चोर्‍यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. 

 अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत खून झाल्यानंतर जिल्हा पोलिस दल बॅकफूटवर गेले आहे. त्या घटनेनंतर पोलिस अधीक्षक म्हणून सुहेल शर्मा या धडाडीच्या अधिकार्‍यांनी सुत्रे हाती घेतली आहेत. पोलिसांचा आत्मविश्‍वास पुन्हा जागविण्यासाठी अधीक्षक शर्मा अथक परिश्रम घेत आहे. वर्दीतील आणि वर्दीबाहेरील गुन्हेगारी सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

मात्र काही पोलिस ठाण्यांतील प्रभारी अधिकारी आणि डीबी शाखेचे कर्मचारी काम करत नसल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. सांगली शहरात एका रात्रीत चाकू आणि तलवारीच्या धाकावर सातजणांना लुटण्यात आले. या घटना मध्यरात्रीपूर्वी घडल्या आहेत. पूर्वी लुटमारीच्या घटना निर्जन रस्त्यावर मध्यरात्रीनंतर घडत होत्या. मात्र आता शहरातील रहदारीच्या रस्त्यावर, भरवस्तीत या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  

बुधवारी रात्री अकराच्या सुमारास सिव्हिलजवळ औषधे घेण्यासाठी आलेल्याला लुटण्यात आले.  या परिसरात मध्यरात्रीपर्यंत सातत्याने वर्दळ असते. अशा ठिकाणीही लूटमार झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्याशिवाय शंभर फुटी रस्ता, संपत चौक, पंचशीलनगर येथेही लूटमारीच्या घटना घडल्या. इतक्या घटना घडूनही पोलिसांना चोरटे सापडत नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. बुधवारी रात्रीच जत-विजापूर रस्त्यावर चोवीस लाखांचे बेदाणे असलेला अख्खा कंटेनरच लंपास करण्यात आला. त्याशिवाय भरदिवसा फ्लॅट फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. 

या महिन्यात सुरूवातीलाच आटपाडी तालुक्यातील राजोबाचीवाडीत सशस्त्र दरोडा पडला होता. अडीच लाखांची लूट करण्यात आली होती. शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव येथे एकाला लुटण्यात आले होते. मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज येथे पोलिस असल्याचे सांगून ट्रक चालकाला लुटण्यात आले. मणेराजुरीत एका रात्रीत दोन घरे फोडण्यात आली. तर माधवनगरमध्ये घरफोडी व बुधगावमध्ये चेन स्नॅचिंगने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. 

गेल्या दोन महिन्यांत सांगली शहरात सर्वाधिक लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. मात्र इतक्या घटना घडूनही चोर पोलिसांच्या हाती लागत नाहीत. त्याशिवाय अशा घटना घडत असतानाही पोलिसांची रात्रीची गस्त आणि नाकाबंदी सुरू आहे की नाही, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून रात्रीची गस्त घातली जाते की नाही याची वरिष्ठ अधिकार्‍यांनी तपासणी करावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. 

Tags : Chain, snatching, burglary, started,Big challenge,  police,