Mon, Jun 24, 2019 17:36होमपेज › Sangli › केंद्रप्रमुख पदासाठी बुध्दीमत्ता परीक्षा

केंद्रप्रमुख पदासाठी बुध्दीमत्ता परीक्षा

Published On: Feb 18 2018 10:42PM | Last Updated: Feb 18 2018 10:34PMसांगली : प्रतिनिधी

राज्यात जिल्हा परिषदांकडील केंद्रप्रमुखांची 40 टक्के पदे सरळ सेवेने, 30 टक्के पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व 30 टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. सरळ सेवा व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेने नियुक्तीसाठी शासन अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेणार आहे. शासनाने अभावितपणे केंद्रप्रमुख पदोन्नतीला फाटा दिला आहे. 

केंद्रप्रमुखांची शंभर टक्के पदे दि. 2 फेब्रुवारी 2010 पर्यंत  पदोन्नतीने भरली जात होती. ग्रामविकास विभागाने  दि. 10 जून 2014 रोजी केंद्रप्रमुख सेवाप्रवेश नियमावली अधिसूचित केली. त्यानुसार केंद्रप्रमुख पद भरतीसाठी सरळसेवा:विभागीय  मर्यादित परीक्षा:पदोन्नती हे प्रमाण 40:30:30 असे केले. सरळसेवा,  विभागीय मर्यादीत परीक्षा न झाल्याने दरम्यानच्या कालावधीत अभावितपणे केंद्रप्रमुख पदोन्नती दिल्या आहेत. 

अभावित केंद्रप्रमुख 63 झाले नियमित; पदावनत कुणीही नाही

राज्यात दि. 2 फेब्रुवारी 2010 ते दि. 10 जून 2014 या कालावधीत अभावितपणे नियुक्त केंद्रप्रमुखांची नियुक्ती शंभर टक्के पदोन्नतीत मोडत असल्याने या शिक्षकांच्या सेवा केंद्रप्रमुख पदावर नियमित करण्यात येत असल्याचे नुकतेच जारी झालेल्या शासन आदेशात म्हटले आहे. त्यानुसार सांगली जिल्हा परिषदेकडील 63 अभावित केंद्रप्रमुख हे केंद्रप्रमुख पदावर नियमित झाले आहेत. 
दरम्यान दि. 10 जून 2014 रोजी व त्यानंतर अभावित केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना पदवीधर पदावर वा समकक्ष पदावर पदावनत करावे, असे शासन आदेशात म्हटले आहे. दरम्यान जिल्ह्यात दि. 10 जून 2014 नंतर सांगली जिल्हा परिषदेकडे अभावित पदोन्नती न दिल्याने एकही केंद्रप्रमुख पदावनत होणार नसल्याचे सांगण्यात आले. 

सरळसेवा व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणारी 70 टक्के पदे ही अभियोग्यता व बुद्धीमत्ता परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. ही परीक्षा 200 गुणांची असेल. अभियोग्यतेसाठी (गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचुकता, भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, कल, व्यक्तीमत्व) 120 गुण व बुद्धीमत्तेसाठी (आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्‍न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी) 80 गुण असणार आहेत. रिक्त पदे त्या-त्या निवड प्रक्रियेंतर्गत भाषा, गणित व विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी समप्रमाणात भरली जातील.