Thu, Apr 25, 2019 07:28होमपेज › Sangli › रंगात रंगली तरुणाई...

रंगात रंगली तरुणाई...

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 8:53PMसांगली : प्रतिनिधी

विविध गाण्यांवर ठेका धरत, एकमेकांना रंगात मनसोक्त बुडवत तरुणाईने जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. तरूण चौकाचौकात रंगाची पोती घेऊन येणार्‍या, जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर रंग फेकून ‘बुरा ना मानो होली है’ असे सांगत होते.  मंगळवारी रंगपंचमी असल्याने सकाळपासूनच तरुणाईने चौकाचौकात रंग खेळण्यास सुरुवात केली होती. लहान मुले तर पिचकारीने एकमेकांना भिजवण्यात दंग होती. डॉल्बी लावून विविध गाण्यांवर बेधुंद होऊन एकमेकांना रंग लावून नृत्य करत होते.  विश्रामबाग चौक, राजवाडा चौक, कॉलेज कॉर्नर, गावभाग, सिव्हिल हॉस्पिटल चौक आदी ठिकाणी तरुण एकत्र येऊन रंगपंचमी साजरी करीत होते. तसेच रस्त्यावरून जाणार्‍या वाहनधारकांवर रंग उधळल्यामुळे वादावादीचे प्रकार घडत होते.    

कृष्णा नदीवर जल्‍लोष

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रंगपंचमीला पाण्याचा वापर कमी करा, असे प्रबोधन काही संघटनांनी केलेले होते. त्याचा परिणाम म्हणून अनेक चौकात पाण्याऐवजी कोरड्या रंगांचा वापर होत असल्याचे दिसून आले. रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात येत होता. पोत्यातून कोरडा रंग घेऊन नागरिकांवर फेकले जात होते. सकाळी गणपती मंदिराच्या पिछाडीस असलेल्या स्वामी समर्थ मंदिराजवळील माई घाटावर कृष्णा नदीवर पोहण्यास येणार्‍या लोकांनी एकत्रित रंगपंचमीचा आनंद लुटला. या वेळीही कोरड्या रंगाची उधळण मोठ्या प्रमाणात केली.

मुलींची टीम आघाडीवर

रंगपंचमीसाठी तरुण रस्त्यावर फिरत असतात. परंतु यावेळी अनेक ठिकाणी तरुणीही एकत्रपणे  दुचाकीने रस्त्यावर रंग लावत फिरत होत्या. काहींनी रंग खेळल्यानंतर रंग वुईथ सेल्फीचा आनंद देखील लुटला.

शहरात नाकाबंदी

रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस विभागाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे हे स्वत: हजर होते. या ठिकाणी दुचाकीस्वारांची तपासणी करण्यात येत होती. काही ठिकाणी हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. रंगपंचमी शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून सुचना देण्यात येत होत्या.