Mon, Nov 19, 2018 04:12



होमपेज › Sangli › सांगली : खूनप्रकरणी संशयितांवर दरोड्याचाही गुन्हा

सांगली : खूनप्रकरणी संशयितांवर दरोड्याचाही गुन्हा

Published On: Jan 07 2018 10:40AM | Last Updated: Jan 07 2018 10:40AM

बुकमार्क करा




सांगली : प्रतिनिधी

शहरातील शास्त्री चौकात झालेल्या शिक्षक सुनील आंबी यांच्या खूनप्रकरणी संशयितांवर दरोडा व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी सोन्याची चेन, अंगठी लंपास केल्याची तक्रार नातेवाईकांनी केल्यानंतर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिली.  

याप्रकरणी आठ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधीर आंबी यांनी फिर्याद दिली आहे. आंबी विश्रामबाग येथील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते. दि. 26 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सुनील आंबी यांना अज्ञातांनी मोबाईलवर फोन करून चर्चा करायचे असल्याचे सांगून शास्त्री चौकात बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, काठीने त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना शंभर फुटी रस्ता परिसरात सोडून देण्यात आले होते.  

रात्री उशिरा त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने नातेवाईकांनी त्यांना कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.  दरम्यान, आंबी यांच्या नातेवाईकांनी शनिवारी निरीक्षक शेळके यांची भेट घेऊन हल्लेखोरांनी सोन्याची चेन आणि अंगठी लंपास केल्याची तक्रार केली. हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.