Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Sangli › समाधानी जगण्याची संधी म्हणजे करिअर : एस. जे. पाटील 

समाधानी जगण्याची संधी म्हणजे करिअर : एस. जे. पाटील 

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 8:21PMसांगली : प्रतिनिधी

यशस्वी, समाधानी जीवन जगण्याची योग्य संधी म्हणजेच करिअर होय. अर्थात करिअरचे उद्दिष्ट दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यावर नव्हे तर त्या आधीच विचारपूर्वक ठरवायला हवे. करिअर निवडताना आपला आयडॉल ठरवून टार्गेटपूर्तीसाठी मास्टर प्लॅनद्वारे दररोज प्रयत्न करायला हवेत, असे मत चाटे शिक्षण समुहाचे कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. सुनील जे. पाटील यांनी व्यक्‍त केले. 

कच्छी जैन सेवा समाज भवन येथे संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी एज्यु-दिशा 2018’  प्रदर्शनात ‘करिअर निवडताना घ्यावयाची दक्षता’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, विद्यार्थी, कुटुंब, सामाजिक आणि जागतिक या चार घटकांतून करिअरची निवड केली जाते. अर्थात करिअर निवडताना अंतिम टप्प्यात सर्वच बाजूने बंबार्डिंग होत असते. हे चुकीचे आहे. त्यासाठी अगोदरच दिशा ठरवायला हवी. प्रसंगी लादलेले शिक्षण चुकीच्या वळणावर आणि अपयशाकडे नेणारे असते. ते चुकीचे आहे. करिअरची वाट ही त्याच्या इच्छेनुसार असली तर ती यशस्वीतेकडे नेणारी असते.

प्रा. पाटील म्हणाले, करिअर निवडताना सर्व पर्याय माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे आवडीनुसार कोणतेही करिअर निवडले तर प्रामाणिक प्रयत्न होऊन त्यामधूनही प्रतिष्ठा, पैसा सर्व काही मिळू शकते. अथार्र्त ते निवडताना भविष्यात त्याच्या संधी आणि गरज हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले, एकूणच शालेय वयातच करिअरचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करा. पालकांनीही पाल्याचा कल व त्याच्या वयाचा, बौद्धिक क्षमतेचा विचार करूनच त्याला योग्य वाट द्यावी. 

आजच्या दिवसात जगा.....!

प्रा. पाटील म्हणाले, गेलेली वेळ परत येत नसते. त्यामुळे करिअर निवडताना आजचा अभ्यास आणि त्याचे टार्गेट आजच पूर्ण करा. दुसर्‍या दिवशी सकाळी  उठल्यावर त्याची उजळणी करा. दुसर्‍या दिवसाच्या काळजीत वेळ घालवू नका. आजचा दिवस जगा. अर्थात प्रयत्न करणे आपल्या हातात असते. कधी कधी शंभर टक्के यशानंतरही अपयश येते. पण त्याने खचून न जाता पुन्हा नव्या दमाने पुढे जाण्याची तयारी ठेवा, यश तुमचेच आहे.