Tue, Jun 25, 2019 14:06होमपेज › Sangli › कार-टेम्पोच्या धडकेत तान्हुल्याचा मृत्यू 

कार-टेम्पोच्या धडकेत तान्हुल्याचा मृत्यू 

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 10:15PMविडणी : वार्ताहर

वाखरी (ता. पंढरपूर) येथे कार व टाटा टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 13 दिवसांच्या नवजात बालकाचा जाग्यावरच मृत्यू झाला. दोन्ही वाहनातील आठजण गंभीर जखमी झाले असून फलटण येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विडणी येथील संदीप कमलाकर अभंग हे गावाकडील सुट्टी  संपवून कुटुंबासह खाजगी वाहनाने मंगळवेढ्याकडे नोकरीच्या ठिकाणी जात होते. आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर वाखरी येथे फलटणच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या टाटा एस टेम्पोने (एमएच 11 एजी 2548) त्यांच्या कारला (एमएच 12-1925) समोरून जोरदार धडक दिली. दोन्ही वाहनातील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले तर दोन्ही वाहनांचा चक्‍काचूर झाला असल्याचे  प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

या अपघातात कारमधील 13 दिवसांचे नवजात तान्हुले जागीच ठार झाले. संदीप अभंग, आदिती अभंग, संदीप नवले, सुनंदा नवले, बाळकृष्ण जगताप, प्रकाश गावडे, विलास पवार, यल्लाप्पा पवार असे दोन्ही वाहनातील 8 जण  गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर फलटण येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्व जखमी फलटण तालुक्यातील विडणी व राजुरी गावचे आहेत.