Sat, Apr 20, 2019 10:08होमपेज › Sangli › कारभारी प्रचारात; सांगली कचर्‍यात 

कारभारी प्रचारात; सांगली कचर्‍यात 

Published On: May 22 2018 1:15AM | Last Updated: May 21 2018 8:45PMसांगली : प्रतिनिधी

एकीकडे स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र शहरात अनेक गल्ली-बोळ आणि उपनगरांत कचर्‍याचे ढीग पडून आहेत. पावसाने राडेराड झाली आहे. अनेक ठिकाणी तळे साचत आहे. नालेसफाईचा पत्ताच नाही. वास्तविक पावसाळापूर्व नियोजन करणे गरजेचे असूनही कोणालाच याचे गांभीर्य नाही. उलट नगरसेवक, पदाधिकारी निवडणुकीच्या द‍ृष्टीने प्रचारात मग्न आहेत. प्रशासनही सुस्तच आहे. एकूणच या अनास्थेने आता पावसाळ्यात शहराची  दैना आणि नागरिकांची त्रेधातिरपीट उडण्याचा धोका आहे.

महापालिकेने जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी राबता ठेवला. परंतु आता पुन्हा ये-रे माझ्या मागल्या असा कारभार सुरू झाला आहे. शहरात प्रत्येक गल्ली-बोळात कचर्‍याचे ढीग ओसंडून रस्त्यांवर वाहत आहेत. त्यात मोकाट जनावरांचा वावर आहे. भरीस भर म्हणून आठवडाभरात झालेल्या पावसाने तो कचरा भिजून दुर्गंधी निर्माण झाली आहे. ड्रेनेज यंत्रणेचा बोजवारा उडाला असून, सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. दुसरीकडे पावसाने गटारी तुंबून अनेक ठिकाणी रस्त्यांवर गटारगंगा  वाहते आहे. 

उपनगरांत अनेक ठिकाणी ड्रेनेज खोदाईने रस्त्यांची चाळण झाली आहे. शामरावनगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, त्रिमूर्ती कॉलनी, आप्पासाहेब पाटीलनगर ते धामणी रस्त्यावरील अनेक उपनगरे, रामनगर, भारतनगर, रुक्मिणीनगर, दत्तनगर, रेपे प्लॉट, काकानगर येथे ड्रेनेज खोदाईने गंभीर स्थिती आहे. कर्नाळ रस्ता, जुना बुधगाव रस्त्यावरील उपनगरे गुंठेवारीतच आहेत. संजयनगर ते कुपवाडकडील शामनगर हा भागही यामध्येच समाविष्ट होतो. मिरजेतही मोठ्या प्रमाणात उपनगरे आहेत. या सर्व उपनगरांमध्ये सांडपाण्याची मुख्य समस्या होती. एकूणच या सर्वच ठिकाणचे रस्ते दलदलीत रुतले आहेत. त्यामुळे आताच नागरिकांना मुख्य मार्गापासूनच या समस्येला कायम तोंड द्यावे लागते. शामरावनगरातील नागरिकांनी तर निवडणुकीवर बहिष्काराची भूमिका घेतली. तरीही अद्याप उपाययोजना झालेल्या नाहीत.

पावसाळा जवळ आल्याने शहरातील नाले, गटारी सफाई, कचरा उठावबाबत तसेच आवश्यक तेथे मुरुमीकरण करण्यासाठी आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापौर, आयुक्‍तांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवकांनी बैठक घेऊन नियोजन करणे आवश्यक होते. परंतु दोन महिन्यात होणार्‍या महापालिका निवडणुकीचे सर्वांना वेध लागले आहेत. दुसरीकडे प्रशासनाचा सत्ताधारी-विरोधकांशी बेसूर असल्याने पावसाळापूर्व काहीच उपाययोजना केलेली नाही.

काढता पाय घेण्याची नामुष्की

प्रतिवर्षी खराब रस्ते आणि पावसाळ्यात होणारी दुरवस्था जनतेने सहन केली. दोन-तीनेवळा झालेल्या पावसाने उपनगरांत पुन्हा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक, पदाधिकार्‍यांना आता जनतेसमोर प्रचारासाठी सामोरे जाताना अडचणीचे ठरू लागले आहे. प्रशासन सूचना करूनही ऐकत नाही, अशी कारणे ते देत आहेत. त्यातच चार सदस्यीय प्रभाग असल्याने जुन्याबरोबरच नव्याही प्रभागात दुरवस्थेमुळे जनतेच्या रोषाला इच्छुकांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी तर पहिल्यांदा ही दुरवस्था दूर करा, मगच मताचा विचार करू, असे ऐकावे लागत आहे. काहींनी तर नादच सोडला आहे.

सोमवारपासून नालेसफाईचा मुहूर्त करू 

आयुक्‍त रविंद्र खेबुडकर म्हणाले, शहरात प्रमुख 18 तर लहान-मोठे असे सुमारे 63 नाले, भोबे गटारी आहेत. पावसाळापूर्व नालेसफाईला विलंब झाला आहे. पण यासंदर्भात नुकतीच आरोग्य विभागाची बैठक घेऊन नियोजन केले आहे. चारही प्रभाग समित्यांमार्फत सोमवारपासून नालेसफाई सुरू होणार आहे. शिवाय शहरात कचर्‍याचे ढीग साचू नयेत यासाठी आरोग्य विभागाला सक्‍त सूचना दिल्या आहेत. जागोजागी खुल्या भूखंडांवर कचर्‍याचे ढीग आणि पाणी साचते. यासाठी संबंधित जागामालकांना ते भूखंड साफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

ड्रेनेज उपशाचा उद्योग

सांगलीतील मुख्य गावठाणचे सांडपाणी पाईपलाईनने कोल्हापूर रस्त्यावरील भारतभीम जोतिरामदादा पाटील कुस्ती आखाड्यातील मलनि:स्सारण केंद्रात शुद्धीकरणासाठी नेले जात होते. ते केंद्र दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे संपूर्ण सांडपाणी भारतनगरमार्गे हरिपूर लोखंडी पूल येथे सोडले जाते. परंतु बॅकवॉटरने हे पाणी शहरात झुलेलाल चौक, मारुती रस्ता, शाहू उद्यान परिसरात पसरत आहे. ते पसरू नये यासाठी जागोजागी विद्युतमोटारी लावून गटारीत सोडले जात आहे. त्यावर लाखो रुपयांचा खर्च सुरूच आहे. पण यावर कायमचा तोडगा काढून केंद्र सुरू करण्याबाबत उदासीनता आहे.