होमपेज › Sangli › योजनांचा बाजार करणार्‍यांचा हिशेब करा

योजनांचा बाजार करणार्‍यांचा हिशेब करा

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 8:59PMसांगली : प्रतिनिधी

शेरीनाला, ड्रेनेज, घरकुलासह विविध योजनांचा बाजार करणार्‍यांना आता जनता किती काळ सहन करणार, असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. महापालिका निवडणुकीसाठी खणभागात भाजपच्या प्रचारसभेत ते बोलत होते. केंद्र, राज्यातून येणार्‍या निधीमार्फत शहराच्या विकासात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लुटारूंचा अडसर आहे, तो आता महापालिका निवडणुकीत पुरता हिशेब करून दूर करा, असेही ते म्हणाले.

यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, महापालिकेची निर्मिती झाल्यापासून गुंठेवारी, शेरीनाला, दूषित पाणी, ड्रेनेज दुरवस्था, कचर्‍याची समस्या हे प्रश्‍न ‘आ’ वासून उभे आहेत. त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या निधीचा वर्षाव होत आला. पण योजना पूर्ण झाल्या नाहीत. एवढेच नव्हे तर हेच दरवेळच्या निवडणुकांमध्ये प्रचाराचे भांडवल ठरले.

अनेकांना निवडणुकीसाठी यातून हातभारही लागला आहे. पण शहराला काय मिळाले? शहराचे वाटोळे करणार्‍यांना कोणी जाब विचारणार आहे की नाही? या अपूर्ण योजनांची दुखणी किती दिवस सहन करणार? याचा सोक्षमोक्ष लावून झालेल्या निधीतून योजना मार्गी लागल्या पाहिजेत. यासाठीच आता शहराचे वाटोळे करणार्‍यांचा निवडणुकीत जनतेने हिशेब करावा. भाजपकडे सत्ता दिल्यास केंद्र, राज्य आणि महापालिका एकमेकांच्या हातात हात घालून शहराचा विकास करेल.गाडगीळ म्हणाले, आमदार या नात्याने शहरात 33 कोटी रुपयांचे रस्ते केले. चांगल्यात चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. पण महापालिकेतील कारभार्‍यांनी त्यातही  अडवणुकीची भूमिका घेतली. यामुळे भाजपला सत्ता द्या, शहराचा 100 टक्के विकास करू.

महापालिकेत तरी अडसर कशासाठी हवा?

खासदार पाटील म्हणाले, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. तशीच महापालिकेतही सत्ता असेल तर आम्हालाही वरून निधी  आणण्यास सोपे जाते. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतींमध्ये  आता भाजपची सत्ता  आहे. त्यामुळे तेथे एकमताने विकास होत आहे. मग महापालिकेत अडसर का?