Thu, Apr 25, 2019 22:11होमपेज › Sangli › देशाच्या निवडणूक पद्धतीत बदल गरजेचा : कॉम्रेड येचुरी

देशाच्या निवडणूक पद्धतीत बदल गरजेचा : येचुरी

Published On: Aug 06 2018 8:16PM | Last Updated: Aug 06 2018 8:50PMविटा : विजय लाळे 

देशाच्या निवडणूक पद्धतीत बदल गरजेचा आहे, आजवरच्या इतिहासात कोणत्याही सत्ताधारी पक्षाला ५० टक्के पेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत , हे लक्षात घेता आता आपल्याकडेसुद्धा काही प्रमाणात अध्यक्षीय राज्य पद्धती स्वीकारली पाहिजे असे स्पष्ट मत भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले. 

विटा (जि. सांगली) येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी कॉम्रेड  येचुरी यांना देण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होत असल्याचे आरोप अलीकडच्या काळात होत आहेत, त्यातच केंद्रातले भाजपा सरकार निवडणूक आयोगावर दबाव आणत आहे असेहि आरोप होताहेत यावर कॉम्रेड येचुरी म्हणाले, इव्हीएम मशीनमध्ये गडबडी होत आहे याबाबत आम्ही काही पक्षांना घेऊन आयोगाशी चर्चा केली, त्यावर उपाय म्हणून मत दिल्यानंतर त्याची प्रिंट कॉपी मतदारांना मिळावी अशी व्यवस्था उत्तर प्रदेशातल्या स्थानिक निवडणुकीत एके ठिकाणी करण्यात आली, परंतु यात समस्येपेक्षा उपाय भयंकर असे काहीसे झाले. तिथे ईव्हीएम सोबतच्या मशीनमध्ये थर्मल पेपर वापरला. त्यामुळे झाले काय कि जी प्रिंट आली ती लाईटमधून पास होऊन कागद आल्या मुळे अस्पष्ट किंवा कोरी आली परिणामी आपण कोणाला मत दिले हे कळण्याऐवजी मतदाराने मतच दिले नाही असे दिसले.त्यातून पुन्हा वादावादी, भांडणे वाढली. त्यामुळे ते प्रकरण बाजूला पडले. आता निवडणुकीतील गैरप्रकार आणि एकूणच पैशांचे व्यवहार वगैरे प्रकार पाहता देशातली निवडणूक पद्धतीत सुधार गरजेचे आहेत. अध्यक्षीय पद्धतीत जसे मत व्यक्तीला नाही पक्षाला द्यायचे असते. पक्ष आपआपल्या विचार धारेच्या आधारावर  आपल्या उमेदवारांची यादी निवडणूक आयोगाकडे निवडणुकीपूर्वी देतात. मतदानानंतर ज्या पक्षाला जास्त मते त्यांची माणसे पदावर येणार. त्यामुळे होईल काय कि निवडणुकीत ना पैशाचा वापर होईल, ना कोणा व्यक्तीची दादागिरी किंवा प्रभाव चालेल. इतर गैरप्रकारांनाही आळा बसेल. परंतु यात आणखी एक समस्याच आहे कि प्रत्येक राज्यांना वाटेल कि आपले आपल्या प्रांतातले , भाषेचे लोक तिथे असावेत आणि ते स्वाभाविकच आहे, त्यावर आमचे असे म्हणणे आहे कि अर्ध्या जागा पक्ष आधीच देईल आणि उरलेले निवडणूक लढून स्वतंत्रपणे निवडून येतील. त्यातून होईल काय कि, लोक मत देताना व्यक्ती ऐवजी त्यांच्या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला मते देतील. लोकसभेतल्या  ५४२ पैकी २७१ जागांचे बहुमत आवश्यक असते.  ते कोणी एक पक्ष मिळवू शकणार नाही त्यातून ज्यांना सत्ता स्थापन करायची आहे ते , इतर समान विचार धारेचे लोक किंवा पक्ष यांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करतील आणि त्यांची मते हि ५० टक्के पेक्षा जास्त असतील. त्यावेळीच लोकशाही हि योग्य पध्दतीने राबवली जात आहे असे म्हणता येईल. 

त्यातून जात, धर्म , दादागिरी , पैसा असल्या गोष्टी निवडणुकीत येणार नाहीत. भाजपा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये गडबडी करते असे आपल्याला वाटते का ? या प्रश्नावर जर अनेक ठिकाणाहून असे प्रश्न उठत असतील तर शंका तर येणारच असेही ते म्हणाले. दरम्यान, धर्म आणि धार्मिकता हे  दोन वेगवेगळे विषय आहेत, एखादा धार्मिक असू शकेल, त्याचे त्याच्या पूजेच्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतील , त्या एकच आणि आम्ही म्हणतोय त्याच असल्या पाहिजेत असा आग्रह करणे, त्या साठी हिंसा करणे हे चुकीचे आहे असेहि त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाबाबत येचुरी म्हणाले, ५० टक्क्यांच्या पेक्षा जादा आरक्षण देता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालय सांगते , तर आपल्या संविधानात धर्म आणि जातीच्या आधारावर कोणतेही आरक्षण नसावे असे म्हटले आहे जो पर्यंत त्यावर संशोधन होणार नाही , सगळे पक्ष मिळून समजदारी दाखवावी लागेल. त्यासाठी जे सरकार आहे त्यांनी इतर पक्षांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे. 
देशात २०१९ ला गैरभाजपा सरकार येणे गरजेचे आहे, लोकांमध्ये या सरकारबद्दल नाराजी आहे चीड आहे, सर्व राज्यात वेगवेगळे पक्ष आहेत. समविचारी पक्ष बरोबर घेऊन एक सर्व मान्य कार्यक्रम आखून लोकांच्या समोर जावे लागेल आणि मोदी सरकारला पर्याय दिला पाहिजे असे ते म्हणाले, यावर परंतु विरोधकांच्यात पर्याय म्हणून कोण आहेत. या प्रश्नावर येचुरी म्हणाले, पर्याय अनेक असतात, हा आजवरचा इतिहास आहे, अगदी इंदिरा गांधी, वाजपेयी यांना सुद्धा पर्याय देशाने दिलेत. निवडणुकी पूर्वी एकत्र येऊन आधी निवडणुका जिंकू आणि नंतर सर्वसंमतीने पंतप्रधान पदाचे बघू असे आमचे धोरण आहे. 

आसाम मधील ४० लाख घुसखोरांच्या मुद्द्यावर येचुरी म्हणाले, एन आर सी मध्ये ज्या तक्रारी आल्या आहेत , त्या तपासल्या पाहिजेत, त्यांचे निराकरण आधी झाले पाहिजे. आपल्या देशाचे हे नागरिक आहेत त्यांना घुसखोर म्हणणे अन्यायकारक आहे. देशाचे एक राष्ट्रपती होते, फकरुद्दीन अली त्यांच्या पुतण्याचे नाव नाही, दोन जुळ्या भावांचे एकाचे आहे एकाचे नाही असे कसे होते ? हा गोंधळ सुरु असतानाच केवळ २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धर्माच्या नावावर लोकांना भडकवण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे.