Mon, Nov 19, 2018 04:12



होमपेज › Sangli › सरकारच्या धोरणाने कष्टकर्‍यांचे शोषण : येचुरी

सरकारच्या धोरणाने कष्टकर्‍यांचे शोषण : येचुरी

Published On: Feb 15 2018 7:47PM | Last Updated: Feb 15 2018 7:46PM



सांगली : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे अल्पसंख्यांक, कष्टकरी, दलित, शेतकरी, शेतमजूर अशा उपेक्षित लोकांचे शोषण सुरू आहे. हा वर्ग एकत्र येऊ नये, यासाठी हेतूपूर्वक जातीय, धार्मिक हिंसाचाराचे विष पेरले जात आहे. त्यामुळे भारताची राज्यघटना, लोकशाही धोक्यात येत आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस आणि माजी खासदार सीताराम येचुरी यांनी केला. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २२ वे राज्य अधिवेशन येथील मराठा समाज भवनमध्ये सुरू झाले. उद्घाटनानंतर येचुरी बोलत होते. तीन दिवस चालणार्‍या या अधिवेशनास आमदार जयंत पाटील, माजी आमदार नरसय्या आडम, प्राचार्य व्ही. वाय. पाटील, अशोक ढवळे, सुधा सुंदररामन, सुभाष पाटील, उमेश देशमुख आदी उपस्थित आहेत. राज्यभरातील ४०० वर प्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित राहिले आहेत. 

देशात गरीब अधिक गरीब...

येचुरी म्हणाले, इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळत असताना मुस्लिमांना ज्या प्रमाणे धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र मिळाले. त्या प्रमाणे उपेक्षितांचे शोषण करण्यासाठी धर्माच्या आधारावर हिंदुस्थानची मागणी केली गेली. मात्र ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता सत्ता मिळाल्यानंतर शोषण करणारी व्यवस्था पुन्हा निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. गरीब अधिकच गरीब होत असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. देशाच्या विकास दरात १ टक्के लोकाकडे ७३ टक्के संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा उपेक्षित वर्ग एकत्र येऊ नये, यासाठी जाती, धर्माचे ध्रुवीकरण केले जात आहे. त्यातून देशाची एकता आणि अखंडता, राज्यघटना धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्याची राज्यघटना मान्य नसल्याचे सांगत ती बदलण्याची भाषा केंद्र सरकारमधील मंत्रीच करीत आहेत, असेही येचुरी म्‍हणाले.

सार्वजनिक क्षेत्र बंद पाडण्याचा घाट

सध्याच्या न्यायव्यवस्थेतसुद्धा असंतोष वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश सरकारच्या विरोधात लोकांसमोर येत आहेत. दिवाळखोरीतील बँका वाचविण्यासाठी सामान्यांचे शोषण केले जात आहे. कामाचे तास वाढविले जात आहेत. निवृत्तीवेतन कमी केले जात आहे. सार्वजनिक क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवून हे क्षेत्रच बंद पाडण्याचा डाव आखला जात आहे. खासगी क्षेत्रामुळे सर्व सत्ता मूठभरांच्या हातात जात आहे. कामगार कायदे बदलले जात आहेत. डिजीटलद्वारे पैसे हस्तांतरणामुळे ठराविक कंपन्यांना कोट्यवधीचा  फायदा होत आहे. शेतकर्‍यांवर जमिनी उद्योजकांना विकून अन्नधान्य विकत घेण्याची वेळ आणली जात आहे.  जीएसटी, नोटाबंदीमुळे छोटे व्यापारी, दुकानदार उध्वस्त झाले आहेत. या सर्वांच्या विरोधात आपण एकत्र येण्याची गरज असल्याचे ते शेवटी म्हणाले. सुरुवातीस स्वागताध्यक्ष व्ही. वाय. पाटील यांचे भाषण झाले.