Tue, Apr 23, 2019 09:34होमपेज › Sangli › तासगावात सीबीआयचा छापा

तासगावात सीबीआयचा छापा

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 11:44PMसांगली : प्रतिनिधी

सीबीआयने गुरुवारी तासगाव येथे छापे टाकले. त्यामध्ये दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. नालासोपारा येथील स्फोटके  सापडल्याचे प्रकरण आणि ‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. स्थानिक पोलिसांनी मात्र याबाबत अधिकृत दुजोरा दिला नाही.

दरम्यान, सीबीआय पथकाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील डाव्या आणि पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. सीबीआय पथकाने गेल्या आठवड्यात मुंबईतील नालासोपारा भागात छापे टाकून   स्फोटके जप्त केली. याप्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर या संशयितांना अटक करण्यात आली होती. 

त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर   औरंगाबाद येथून सचिन अंदुंरे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तपासात  डॉ. दाभोलकर यांच्या खून प्रकरणात अंदुरे याचा सहभाग असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्यातूनच डॉ. दाभोलकर, तसेच कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनांतही त्यांचा सहभाग असावा, असा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे.    एटीएस आणि सीबीआय पथकाचा कसून तपास सुरू आहे.  आणखी  कोणी या प्रकरणात सहभागी आहेत का, कोणावर हल्ला करावयाचा होता का, याची चौकशी करण्यात येत आहे. त्यातून तासगावमधील दोघांची नावे पुढे आली. 

सीबीआयचे पथक आज, गुरुवारी दुपारी तासगावमध्ये आले. दोघांना ताब्यात घेतले. ते एका संस्थेशी संबंधित असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या कारवाईबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर तासगाव पोलिसांनी या संस्थेच्या कार्यकर्त्यांची यादी तयार  करण्यास सुरूवात केल्याचे सांगण्यात आले. 

दुसर्‍या बाजूला पोलिसांनी सीबीआय पथकाच्या कारवाईनंतर पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या सुरक्षितेत वाढ केली आहे. पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय आणि बंदोबस्त असल्याशिवाय कोठेही जाऊ नये, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे डॉ. दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या प्रकरणाची पाळेमुळे येथेपर्यंत आहेत  काय, याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांना गेल्या काही दिवसांपासून पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. आजच्या एटीएस पथकाच्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी त्यांची सुरक्षितता वाढवली आहे. त्याशिवाय ‘कोठेही बाहेर जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या’, असे  त्यांना सांगितले आहे. 

कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ

सीबीआय पथकाने दुपारी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली. ताब्यात घेतलेल्यात विविध व्यक्‍तींच्या नावांची आणि संघटनांच्या नावांची चर्चा होती; मात्र त्याला रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळत नव्हता.  

आणखी काही तरुण ‘रडार’वर

सीबीआय पथकाने तासगावमधून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आणखी काही तरुणांवर कारवाई होणार, अशी चर्चा आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांच्या मित्रांच्या हालचालींवर गुप्तपणे नजर ठेवण्यात येत आहे, तशी माहिती पोलिसांतील अधिकृत सूत्रांनी दिली.