Fri, Nov 24, 2017 20:20होमपेज › Sangli › अनिकेत खूनप्रकरणी प्रसंगी ‘सीबीआय’ चौकशी

अनिकेत खूनप्रकरणी प्रसंगी ‘सीबीआय’ चौकशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सध्या ज्यांना अटक झाली आहे, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न राहीलच. त्याशिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. सीआयडीकडून संबंधित दोन्ही व्यापार्‍यांचीही चौकशी सुरू आहे, अशी माहिती पालकमंंत्री सुभाष देशमुख आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर  यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, या प्रकरणाची सीआयडीमार्फत व्यवस्थित चौकशी सुरू आहे. त्यात काही त्रुटी आढळल्यास प्रसंगी सीबीआयमार्फतही चौकशी केली जाईल. दरम्यान, कोथळे कुटुंबीयांच्या  बहुसंख्य मागण्या पूर्ण केल्या आहेत. अन्य मागण्या पूर्ण करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, रविवारी मी  कोथळे कुटुंबीयांना भेटून आश्‍वासन दिले होते. त्यानुसार त्याची पूर्तता करण्यासाठी मी लगेच येथे आलो आहे. त्यांचे दुःख हे न भरून निघणारे आहे. दहा लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण देण्यात येणार आहे. जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात येणार आहे. डीएनए तपासणीसाठी अनिकेतच्या आई-वडिलांचे रक्‍ताचे नमुने घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे निर्णय घेण्यात आले आहेत. दोन्ही व्यापार्‍यांचीही सीआयडीमार्फत चौकशी सुरू केली आहे.   

सुभाष देशमुख म्हणाले, कोथळे कुटुंबीयातील एका व्यक्‍तीला सरकारी नोकरीत सामावून घेण्यात येईल. जागा उपलब्धतेनुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

सांगलीकरांची संयमाची भूमिका चांगली
देशमुख आणि केसरकर म्हणाले,कोथळे कुटुंबीयांच्या पाठीशी सर्व सांगलीकर संयमाने राहिले. कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही. ही भूमिका चांगली आहे. सरकारही या कुटुंबीयांच्या पाठीशी  शेवटपर्यंत ठामपणे राहील.  यापुढेही तपासासाठी सीआयडीला मदत करावी. 

आधुनिक सीसीटीव्हीसाठी भरीव तरतूद
पोलिस खात्यातील त्रुटी दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. पोलिस ठाण्यात आधुनिक पद्धतीची सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यास सांगण्यात आले आहे.