Mon, Aug 19, 2019 07:26होमपेज › Sangli › ‘दान’ मोफत; तर रक्त माफक दरात का नाही?

‘दान’ मोफत; तर रक्त माफक दरात का नाही?

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Aug 31 2018 7:57PMमिरज : जालिंदर हुलवान

रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक रक्तदाता हा विनामोबदला रक्तदान करतो. पण रक्तदानानंतर त्या रक्ताची भरमसाठ दराने विक्री केली जाते. हे रक्त जरी मोफत नाही मिळाले तरी माफक दरात का मिळत नाही, असा सवाल केला जात आहे. दान केेलेले रक्ताचा व्यवसाय न होता, ते माफक दरात मिळाले पाहिजे. यासाठी तशी चळवळ उभारण्याची गरज आहे. 

आरोग्य बिघडले की त्यावर इलाज हा झालाच पाहिजे. यासाठी रुग्ण आणि त्याचे नातेवाईक धडपडत असतात. आरोग्यासाठी रक्त हा सर्वात महत्वाचा घटक आहे. अपघात झाला किंवा अन्य कोणत्याची आजारासाठी रक्ताची तातडीने गरज असते. त्यामुळे रक्तदान करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक सामाजिक संस्था या रक्तदान शिबिरे घेतात. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचतो. 

शिबिरांमध्ये किंवा थेट रुग्णालयात रक्तदान झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी रक्तपेढीची गरज असते. त्यासाठी जिल्ह्यात रक्तपेढ्या सुरू झाल्या. सांगली जिल्ह्यामध्ये 15 खासगी रक्तपेढ्या आहेत. शासकीय रुग्णालयामध्ये दोन रक्तपेढ्या आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रक्तपेढ्या या मिरज शहरात आहेत. सांगलीत 4, मिरजेत 7, इस्लामपूरमध्ये 2 आणि जतमध्ये 1 अशा 15 खासगी रक्तपेढ्या आहेत. रक्तपेढ्यांशिवाय काही ठिकाणी रक्त स्टोअरेज केंद्रे आहेत. मिरजेत 2, आष्ट्यात 1, जतमध्ये 1, कवठेमहांकाळमध्ये 1 स्टोअरेज बँक आहे. या रक्तपेढ्या आणि स्टोअरेच बँकांवर पूर्णपणे अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण असते. रक्तदान शिबिर घेणे, रक्तसंकलन करणे, प्लेटलेट्स, प्लाझ्मा, रेड ब्लड सेल (आर.बी.सी.) व्होल रक्त तयार करून ते रुग्णांना देण्याचे काम रक्तपेढ्यांकडून केले जाते.

रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची परवानगी ही राज्य रक्त संकलन परिषद (मुंबई) यांच्याकडून दिली जाते. रक्तपेढीचा संपूर्ण अहवाल हा प्रत्येक महिन्याला राज्य रक्त संकलन अधिकार्‍याकडे पाठवावा लागतो. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा किती स्टॉक आहे, यासह सर्वप्रकारची माहिती पेढीमध्ये बाहेरील बाजूस फलकावर देण्याचा नियम आहे. थॅलेसिमिया व थिमोफेलिया (शरीरात रक्त तयार न होण्याचा आजार) असा आजार असणार्‍या रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत रक्त देण्याचा नियम आहे. रक्तपेढ्यांना दिलेल्या नियमांमध्ये त्यांनी जर काम केले नाही तर त्या पेढ्या बंद करण्याचे अधिकार हे अन्न व औषध प्रशासनाला आहेत. पण रक्तपेढ्यांनी नियमभंग केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रमाण हे अत्यंत कमी आहे. या रक्तपेढ्यांकडे अन्न व औषध प्रशासन का लक्ष देत नाही, हे समजत नाही. जिल्ह्यातील काही रक्तपेढ्या ह्या अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतात. पण इतरांच्या बाबतीत अन्न औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 

एकीकडे रक्तदान म्हणजे मोफत घेतले जाते. तर मग ते रक्त रुग्णाला विकण्याची पध्दत का आहे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे रक्तदान म्हणून अशी चळवळ मोठ्या प्रमाणात उभारली आहे. तशीच चळवळ आता रक्त विक्री हा शब्द खोडून काढून रक्तदान अशीच ठेवण्यासाठी उभारली पाहिजे. 

रक्तदात्यांना हेल्मेट व अन्य वस्तूंचे आमिष का?

गेल्या काही वर्षांपासून रक्तदात्यांना वेगवेगळी आमिषे दाखविली जात आहेत. अशी आमिषे दाखविल्याने आपल्याकडे रक्त मिळेल असे फंडे काही रक्तपेढ्यांकडून वापरले जात आहेत. वास्तविक जो रक्तदान करतो, त्या रक्तदात्याला कसलीच अपेक्षा नसते. त्याला अपेक्षा असते ती आपण रक्त ज्या रुग्णासाठी देतो तो बरा झाला पाहिजे. असे वास्तव रक्तदात्यांच्या बाबतीत असताना मग रक्तदात्यांना भेटवस्तू कशासाठी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

रक्ताची तिप्पट दराने विक्री

350 मिलिलिटर रक्ताच्या संपूर्ण तपासणी व अन्य प्रक्रियेसाठी सुमारे 300 ते 400 रुपये खर्च येत असेल, तर ते रक्त तिप्पट किंमतीला का विकले जाते? व्होल ब्लडची विक्री 1250 रुपये (350 मिलिलिटर), आरबीसी (तांबड्या पेशी) 1250 रुपये (250 ते 280 मिलिलिटर), प्लाझ्मा 400 रुपये (80 ते 100 मिलिलिटरसाठी), प्लेटलेट्स 400 रुपये (50 ते 100 मिलिलिटरसाठी) दर आहे. रक्तदान शिबिरासाठी प्रत्येक रक्तदात्यासाठी खर्च म्हणून शासनाकडून 25 रुपये दिले जातात. केवळ फायद्यासाठी रक्ताची विक्री न करता ती गरजवंताला माफक दरात मिळाली पाहिजे.

थॅलेसिमिया तपासणी यंत्राची आवश्यकता

थॅलेसिमिया हा रक्ताचा एक गंभीर आजार आहे. हा आजार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आठवड्याला त्याची तपासणी करावी लागते. खासगी रुग्णालयात अवाढव्य खर्च येतो. यामध्ये बोनमॅरोची तपासणी करावी लागते. परंतु शासकीय रुग्णालयात हा आजार तपासण्यासाठी यंत्र उपलब्ध नाही. संवेदना मेडिकल फाऊंडेशनचे बरकत पाटणकर यांनी या आजारासाठी चळवळ सुरू केलेली आहे. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन यंत्र बसविण्याची मागणी केली आहे. तसेच दानशूर व्यक्तिंनी शासकीय रुग्णालयात यंत्र बसविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.